Crime news: शेतकऱ्याला हिंमत अंगलट आली, 3 एकरावरील अफू शेतीवर पोलिसांनी धाड टाकली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:55 PM2022-03-04T16:55:53+5:302022-03-04T17:02:40+5:30
Crime news: लागवड केलेल्या अफूची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
जळगाव - जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वाळकी येथे अफूच्या शेतीवर पोलिसांनी कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाल आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वतः ही कारवाई केली. येथील एका शेतकऱ्याने 3 एकर क्षेत्रावर केली अफूची लागवड होती, साधारणपणे 3 महिन्यांपूर्वी ही लागवड करण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. शेतातील अफूची शेती सहजपणे कुणाच्या निदर्शनास येऊ नये म्हणून शेतकऱ्याने आजूबाजूला मक्याची लागवड करून आत अफू लावला होता.
लागवड केलेल्या अफूची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या शेतातील अफूच्या शेतीबाबत पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानंतर, शेतकऱ्याने अफूची शेती केल्याची खात्री झाल्यानंतरच शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षकांनी स्वत: या शेतकऱ्याच्या शेतात धाड टाकून कारवाई केली. त्यानंतर, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतकऱ्याला अटक झाली आहे. अफूच्या शेतीचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी कृषी अधिकारी व तलाठ्याच्या उपस्थितीत पोलिसांनी माहिती घेतली. पोलीस अधिक्षकांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.