Crime News: चौल भोवाळे येथील दत्त मंदिरात चोरी, ४० किलो चांदी नेली चोरून, चोरटा सीसीटीव्हीत कैद
By राजेश भोस्तेकर | Published: December 16, 2022 04:17 PM2022-12-16T16:17:31+5:302022-12-16T16:18:25+5:30
Crime News: अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात चांदी चोरी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. श्री दत्त मूर्तीच्या मागे भिंतीला लावलेली ४० किलो चांदी चोरट्याने चोरली आहे.
अलिबाग - अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात चांदी चोरी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. श्री दत्त मूर्तीच्या मागे भिंतीला लावलेली ४० किलो चांदी चोरट्याने चोरली आहे. चोरी करणारा चोर हा सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. या चोरट्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, रेवदंडा पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. सीसीटिव्ही चोरटा कैद झाल्याने लवकरच तपास लागला जाईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.
चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिर हे प्रसिद्ध आहे. डिसेंबर महिन्यात दरवर्षी मोठी यात्रा याठिकाणी भरत असते. नुकतीच ७ ते ११ डिसेंबर अशी पाच दिवस यात्रा संपन्न झाली होती. चारच दिवसांनी शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी चोरट्याने मंदिरातील चांदीवर डल्ला मारला आहे. त्यामुळे एकच खळबळ तालुक्यात माजली आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
श्री दत्त मंदिरात चोरी झाल्याचे कळल्यानंतर त्वरित रेवदंडा पोलिसांना घटनेची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मंदिरात असलेल्या सीसीटिव्हीमध्ये चोरी करणारा चोर कैद झाला आहे. चोर हा एक आहे की त्याचे अन्य साथीदार आहेत. याबाबत पोलीस तपास सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात पाच दिवस यात्रा असल्याने या काळात चोरट्यांनी रेकी केली असल्याचा संशय आहे. त्यानंतर त्यांनी चांदिवर डल्ला मारला आहे. मंदिरात भिंतीला लावलेली ४० किलो चांदी ही अज्ञात चोरट्याने पळवली आहे. त्यामुळे या चोरट्यांना शोधण्याचे आव्हान रायगड पोलिसांना आहे.
चोरीचा तपास करण्यासाठी पथक तयार
चोरीची घटना कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे विभाग आणि रेवदंडा पोलीस याचे पथक चोरीचा छडा लावण्यासाठी तयार केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनीही घटनास्थळी भेट दिली.