Crime News: चाेर आले, ५०० टनांचा लोखंडी पूल घेऊन गेले! सिंचन विभागाचे कर्मचारी बनूून गॅस कटरने केले तुकडे, तीन दिवसांनी प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 07:19 AM2022-04-10T07:19:22+5:302022-04-10T07:20:03+5:30
Crime News: चोर आणि त्यांनी लंपास केलेले मौल्यवान साहित्य याच्या रंजक कथा आपण सतत ऐकत-वाचत असतो. बिहारच्या रोहतस जिल्ह्यात मात्र भरदिवसा झालेली एक अजब चोरी तब्बल तीन दिवसांनी उघडकीला आली आहे.
सासाराम (रोहतस) : चोर आणि त्यांनी लंपास केलेले मौल्यवान साहित्य याच्या रंजक कथा आपण सतत ऐकत-वाचत असतो. बिहारच्या
रोहतस जिल्ह्यात मात्र भरदिवसा झालेली एक अजब चोरी तब्बल तीन दिवसांनी उघडकीला आली आहे. सिंचन विभागाचे कर्मचारी बनून आलेल्या चोरांनी चक्क एका कालव्यावर बांधलेला एक लोखंडी पूलच लांबवला आहे. जेसीबीने पूल तोडल्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने त्याचे तुकडे करून चोर ट्रकमधून घेऊन पसार झाले आहेत. तीन दिवस सिंचन विभागाला या प्रकाराची सूतराम कल्पनाही नव्हती. (वृत्तसंस्था)
...चोरांनी नेमका डाव साधला
सिंचन विभागाच्या विक्रमगंज सब डिव्हिजनचे सहायक अभियंता राधेश्याम सिंह म्हणाले की, येथील गावकऱ्यांनी पूल हटवण्याची मागणी केली होती. त्यासाठी रितसर निवेदनही वरिष्ठांकडे दिले होते. परंतु त्याबाबत पुढे काहीही आदेश मिळाले नव्हते. चोरांनी नेमके हे हेरले आणि आपला डाव साधला.
गावकऱ्यांनी हटकले, पण...
n रोहतसमधील सासाराम परिसरात एका कालव्यावर ४७ वर्षांपूर्वी हा पूल बांधला होता. १०० फूट लांब आणि १० रुंद पुलासाठी ५०० टन लोखंडाचा वापर केला होता. तोडणे सुरू असताना गावकऱ्यांनी चोरांना हटकलेही.
n तेव्हा आम्ही सिंचन विभागाकडून आलो आहोत, असे चोरांनी सांगितले. पूल काही अंशी नादुरुस्त झाल्याने सध्या त्याचा वापर होत नव्हता.
n खरा प्रकार लक्षात आल्यानंतर सिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल केला आहे.