नात्याला काळीमा! 3 महिन्यांचं प्रेम अन् अवघ्या 20 दिवसांचा संसार; लव्ह स्टोरीचा असा झाला भयंकर शेवट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:27 PM2021-10-22T19:27:52+5:302021-10-22T19:36:36+5:30
Crime News : प्रेमविवाहानंतर पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. लग्नानंतर अवघ्या वीस दिवसांत एका तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा प्रेमविवाह झाला होता. पण 20 दिवसांतच तिच्या लव्हस्टोरीचा भयावह शेवट झाला आहे. प्रेमविवाहानंतर पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा चौहान असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. तर राहुल बाथम असं आरोपी पतीचं नाव असून तो पटेल नगर हरगोविंदपुरम येथील रहिवासी आहे. नेहाची अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आरोपी राहुलशी ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच दोघांनी गावाजवळील एका मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला होता. मुलीने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा विवाह केला होता. तिने आरोपी राहुलसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. पण लग्नानंतर सर्वकाही बदललं.
लग्नाच्या दुसऱ्या दिवसानंतरच आरोपी बेदम मारहाण करू लागला
नेहा सिटी सेंटर पटेल नगरमधील शोरूमजवळील एका खासगी कार्यालयात काम करायची. कामावर येता-जाता तिची ओळख राहुल बाथमशी झाली होती. हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेली भेटी गाठी वाढल्या. 22 ऑगस्ट रोजी दोघांनीही आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन गावाजवळील एका मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला. पण लग्नानंतर लगेच दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. लग्नाच्या दुसऱ्या दिवसानंतरच आरोपी राहुल तिला बेदम मारहाण करू लागला होता.
तरुणीच्या नातेवाईकांनी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा केला दाखल
पतीला दारूचं व्यसन असल्याचंही नेहाला कळालं. 11 सप्टेंबर रोजी मृत्यूच्या आदल्या दिवशी देखील नेहा आणि राहुल यांच्यात वाद झाला होता. वादानंतर दोघं पती-पत्नी आपल्या घरात झोपले होते. 12 सप्टेंबर रोजी पती राहुल झोपेतून उठला असता, त्याच खोलीत नेहा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.