crime News: लुटमार प्रकरणातील तीन संशयित ताब्यात, दहा लाख लंपास, व्यापाऱ्याला लुटून केला प्राणघातक हल्ला
By रवींद्र चांदेकर | Published: August 18, 2022 07:49 PM2022-08-18T19:49:48+5:302022-08-18T19:50:14+5:30
Crime News: माहूर तालुक्यातून किराणा मालाच्या रकमेची वसुली करून परतणारे व्यापारी अनिल शर्मा यांना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खडका पुलावर लुटण्यात आले होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पैशाची बॅग लंपास केली होती
- रवींद्र चांदेकर
यवतमाळ : माहूर तालुक्यातून किराणा मालाच्या रकमेची वसुली करून परतणारे व्यापारी अनिल शर्मा यांना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खडका पुलावर लुटण्यात आले होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पैशाची बॅग लंपास केली होती. या प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अनिल शर्मा माहूर तालुक्यात वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना खडका फाट्यानजीक त्यांची दुचाकी आरोपींनी अडविली. त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र शर्मा बॅग देत नसल्याचे बघून आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्त्याराने जीवघेणा हल्ला केला होता. यात शर्मा गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची जवळपास दहा लाख रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता.
जखमी अवस्थेत शर्मा जवळपास एक किलोमीटर अंतर चालत गेले. दरम्यान त्यांना तातडीने प्रथम पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर बुधवारी रात्रीच नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेनंतर बुधवारी सायंकाळीच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नाकाबंदीचे आदेश दिले होते. दरम्यान महागाव पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. नॅशनल हायवे लगतच्या सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांनी पाहणी केली. या प्रकरणा एकूण सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तीन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
रविवारी बाजारपेठ बंद
या घटनेमुळे हादरलेल्या व्यापाऱ्यांनी महागावची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी व्यापारी महासंघाने तहसीलदारांना निवेदन दिले. त्यातून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान महागावचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पाच पथके रवाना केल्याचे सांगितले. लवकरच उर्वरित आरोपींना पोलीस अटक करतील, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
तीन संशयितांना स्थानिक पोलीस व एलसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. अद्याप काही आरोपींना अटक करणे तसेच लुटीतील रक्कम जप्त करणे बाकी आहे. - प्रदीप पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड