नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; पत्नी आणि मुलांची विष पाजून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 09:09 AM2021-12-18T09:09:34+5:302021-12-18T09:11:23+5:30
Crime News : हुंड्यासाठी पती हैवान झाला आहे. पत्नी आणि दोन मुलांना विष पाजून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नवी दिल्ली - बिहारमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. हुंड्यासाठी पती हैवान झाला आहे. पत्नी आणि दोन मुलांना विष पाजून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारमधील नालंदा येथील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुड्डू पासवान असं फरार आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चकियापार गावात गुड्डू पासवान आपल्या कुटुंबासोबत राहतो. 2015 मध्ये त्याचं लग्न झालं होतं. त्याला तीन वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी अशी दोन मुले आहेत. गुड्डू आणि त्याच्या पत्नीमध्ये हुंड्यावरुन दररोज वाद होत होते. हुंड्य़ासाठी सासरची मंडळी तिच्यावर दबाव टाकत होते. तिचा शारीरीक आणि मानसिक छळ केला जात होता. याच दरम्यान गुड्डूने टोकाचं पाऊल उचललं आणि आपल्या पत्नी व मुलांना संपवण्याचा मोठा निर्णय घेतला.
पत्नीला आणि दोन लहान मुलांना पाजलं विष
गुड्डूने आपल्या पत्नीला आणि दोन लहान निष्पाप मुलांना विष पाजले. यात त्या तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीडितेच्या सासूला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर हुंड्यासाठी महिलेला प्रचंड त्रास दिला गेला. महिलेला माहेराहून पैसे आणण्यासाठी सांगितले जात होते. याच दरम्यान तिला दोन मुलं झाली. पण मुलं झाल्यानंतर देखील तिला त्रास देण्यात आला आणि वारंवार हुंड्याची मागणी करण्यात आली.
सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
विष प्याजल्य़ामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. घटनेनंतर पीडिताच्या कुटुंबीयांनी सासरच्या आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हुंड्याची मागणी करीत हत्या केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.