Crime News: विसर्जनानंतर दोन गटात किरकोळ कारणावरून भांडण, मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 01:49 PM2022-10-06T13:49:39+5:302022-10-06T13:49:56+5:30
Crime News: मनवेल पाडा परिसरात बुधवारी रात्री दोन गटात मारहाण सुरू होती. ही मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरूणाला झालेल्या मारहाणीत त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा - मनवेल पाडा परिसरात बुधवारी रात्री दोन गटात मारहाण सुरू होती. ही मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरूणाला झालेल्या मारहाणीत त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांसमोरच या तरुणाची हत्या केल्याचा आरोप करत गुरुवारी सकाळी संतप्त नागरिकांनी विरार पोलीस ठाण्यात गोंधळ घालून घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आले. विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चार आरोपींना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
विरारच्या सहकार नगर परिसरात बिठूरमाळी कंपाऊंड येथे राहणारा व केस कर्तनाचा व्यवसाय करणारा मुन्ना उर्फ बैजनाथ शर्मा (२८) या तरुणाची हत्या झाली आहे. सोसायटीतील नागरिकांच्या सोबत बैजनाथही देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. विसर्जन झाल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी कारणावरून दोन गटात भांडणे होऊन हाणामारी सुरू झाली. मारहाण सुरू असल्याचे बैजनाथला समजल्यावर तो भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर त्यालाच सात ते आठ जणांनी बांबू, फरशी, लादी, लोखंडी सळईने मारहाण केली. त्याच्या एका मित्राने आयुक्तालयाच्या ११२ नंबरवर कॉल करून घटनेची माहिती दिल्यावर विरार पोलीस ठाण्यातून दोन बिट मार्शल घटनास्थळी आले. त्यानंतर तेथील लोकांनी भांडण मिटले सांगितल्यावर पोलीस निघून गेले.
या मारहाणीत शर्मा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले असता गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी संतप्त जमावाने विरार पोलीस ठाण्यात गर्दी करत पोलिसांना घेराव घातला. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले असून हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतला सांगितले.