Crime News: लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीच्या नावे विद्यापीठात लाखोंची खंडणी वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 07:22 AM2022-11-13T07:22:51+5:302022-11-13T07:23:14+5:30
Crime News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून लाखोंची खंडणी वसूल केल्याचा प्रकार उजेडात आला.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून लाखोंची खंडणी वसूल केल्याचा प्रकार उजेडात आला. तक्रारींची शहानिशा करण्याच्या समितीवर असून त्यातून वाचवू, असे सांगून जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक व जनसंपर्क अधिकारी धर्मेश धवनकर यांनी खंडणी वसुली केल्याचा आरोप असून तशी सामूहिक तक्रार कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी तसेच राज्यपाल व उच्च शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
सातही तक्रारकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना अधिक तपशील दिले असून, पोलिसांकडे जाण्याचीही तयारी ठेवली आहे. विद्यार्थिनींनी तुमच्याविराेधात लैंगिक छळाची तक्रार केली असून विद्यापीठाने चाैकशी समिती गठित केली आहे. विद्यापीठाचा लीगल सेल व तथ्यशोध समितीवर नियुक्त वकिलांना पैसा दिल्याशिवाय हे मिटणार नाही. त्यासाठी पैसा द्या, असे सांगून धर्मेश धवनकर यांनी लाखाे रुपये वसूल केले, असा आरोप आहे. परंतु विद्यापीठाने कसलीही समिती गठित केली नसल्याची शहानिशा झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित तक्रार केली.
यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर धवनकर यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे म्हटले आहे.
या विभागप्रमुखांची झाली फसवणूक
पुरातत्त्व तसेच प्रवास व पर्यटन विभागाचे प्रमुख डाॅ. प्रियदर्शी खाेब्रागडे, लाेकप्रशासन विभागाचे प्रमुख डाॅ. जितेंद्र वासनिक, समाजशास्त्र विभागप्रमुख डाॅ. अशाेक बाेरकर, ग्रंथालयशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सत्यप्रकाश निकाेसे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सत्यप्रिय इंदूरवाडे, जीवरसायन विभागप्रमुख डाॅ. वीरेंद्र मेश्राम, डाॅ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डाॅ. शैलेंद्र लेंडे यांची फसवणूक झाली. त्यांच्याकडून ३ ते ७ लाख अशी रक्कम उकळण्यात आली.