खळबळजनक! ऑपरेशन करताना महिलेचा मृत्यू; रुग्णालयाला ताळं लावून पळाले डॉक्टर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:24 PM2022-02-09T14:24:01+5:302022-02-09T14:33:36+5:30
Crime News : एका खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या 25 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या 25 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे गोंधळ होईल या भीतीने डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णालयाला ताळं लावून पळून गेल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी रुग्णालयाला लावलेलं ताळं तोडून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या इतर रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आहे. तसेच हे रुग्णालय सील करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ऑपरेशन दरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने भीतीमुळे मृत महिला आणि तिच्या नातेवाईकांना रुग्णालयाबाहेर काढलं. यानंतर महिलेचे नातेवाईक चिडले. त्यांना गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्य गेटला ताळं लावलं आणि ते पळून गेले. रुग्णालयात उपचारासाठी इतरही रुग्ण दाखल होते. सुचना मिळताच पोलीस आणि आरोग्य अधिकारी रुग्णालयात आले. त्यांनी ताळं तोडलं.
"रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धक्के मारून आम्हाला बाहेर काढलं"
मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय महिलेला मोहब्बतपूर गावातून डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने 50 हजार रुपयांत नॉर्मल डिलिव्हरी होईल असं सांगितलं. त्यानुसार 30 हजार जमा केले होते. पण ऑपरेशन दरम्यान तिची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धक्के मारून आम्हाला बाहेर काढलं. तसेच रुग्णालयाला ताळं लावून ते पळून गेले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.