नात्याला काळीमा! ...म्हणून 'तिने' नवऱ्याचाच काढला काटा; मुलगा आणि दिरानेही दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 07:52 PM2021-10-30T19:52:16+5:302021-10-30T19:58:55+5:30
Crime News : पतीची हत्या केली आणि पतीचा मृतदेह हा शेतात जाळून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान आता नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. जमीन विकण्याच्या वादातून पत्नीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला तिचा मुलगा आणि दीर यांनी देखील साथ दिली आहे. या तिघांनी मिळून पतीची हत्या केली आणि पतीचा मृतदेह हा शेतात जाळून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील करौली भागात एका व्यक्तीकडे वडिलोपार्जित जमीन होती. त्याची पत्नी शीतलबाई, भाऊ गोविंद आणि मुलगा जितेंद्र यांच्यासोबत त्याचे सतत वाद होत असत. गेल्या काही वर्षात कर्जबाजारी झालेल्या व्यक्तीकडे उत्पन्नाचं काहीही साधन नव्हतं. शेतीतून मिळणारं उत्पन्न हे कर्ज फेडण्यासाठी पुरेसं नसल्यामुळे ती जमीन विकून कर्ज फेडण्याचा विचार तो करत होता. मात्र त्याच्या पत्नी आणि मुलाला ही बाब मान्य नव्हती. भाऊ गोविंदचाही ही जमीन विकायला विरोध होता.
रागाच्या भरात पतीला बेदम मारहाण
जमिनीवरून पती-पत्नीत सतत टोकाचा वाद होत असे. याच वादाचं रुपांतर पुढे मारहाणी झालं. पत्नीने रागाच्या भरात पतीला बेदम मारहाण केली. तिच्यासोबत मुलाने आणि भावानेदेखील त्याच्यावर वार केले. लाठाकाठ्यांनी मारून त्याला जखमी करण्यात आले. यामध्येच पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि इतरांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय़ घेतला.
पोलिसांनी तिघांनाही केली अटक
घरासमोर असणाऱ्या शेतात पतीचा मृतदेह जाळण्यात आला. मात्र पतीच्या एका नातेवाईकाने त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.