भयंकर! "मला हत्येचा पश्चाताप नाही"; पत्नीने 2 प्रियकरांच्या मदतीने केले पतीच्या मृतदेहाचे 7 तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:34 IST2022-06-17T16:28:22+5:302022-06-17T16:34:34+5:30
Crime News : दहा दिवसांपूर्वी कृष्णाचा खून त्याची पत्नी सपना उर्फ सोनू (40) हिने केला होता. यामध्ये त्यांच्या मुलाने देखील तिला साथ दिली होती.

भयंकर! "मला हत्येचा पश्चाताप नाही"; पत्नीने 2 प्रियकरांच्या मदतीने केले पतीच्या मृतदेहाचे 7 तुकडे
नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात ट्रकचालक कृष्णा उर्फ बबलू याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने 2 प्रियकरांच्या मदतीने पतीच्या मृतदेहाचे 7 तुकडे केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये महिलेच्या मुलानेही साथ दिली. आरोपींनी धड घराजवळ पुरले आणि हातपाय जंगलात फेकले. तपासात पोलिसांनी धड जप्त केले असले तरी बाकीचे अवयव सापडले नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वी कृष्णाचा खून त्याची पत्नी सपना उर्फ सोनू (40) हिने केला होता. यामध्ये त्यांच्या मुलाने देखील तिला साथ दिली होती. सपनाचे कसाई रिजवान कुरेशी आणि भय्यू कुरेशी यांच्याशी संबंध होते. पतीचा मृतदेह कापण्यासाठी तिने दोघांना बोलावले होते. हत्येनंतर सपनाने पोलिसांना याबाबत काहीही पश्चाताप नसल्याचं सांगितलं. पतीला मारण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं देखील म्हटलं आहे. आरोपींनी देव गुराडियाजवळील जंगलात शरीराचे इतर भाग फेकले असल्याची माहिती दिली आहे.
जंगलात शोध घेत असताना पोलिसांना रक्ताने माखलेली प्लास्टिकची पिशवी सापडली, मात्र शरीराचा कोणताही भाग सापडला नसल्याचं सांगण्यात येत आहे. मृतदेहाचे तुकडे करून देवास येथे पळून गेल्याचे रिजवान आणि भय्यू यांनी सांगितलं. पोलीस आल्याची माहिती मिळताच त्याने खिलचीपूरला पळून जाण्याचा बेत आखला. पोलिसांनी रिजवानच्या मोठ्या भावावर कडक कारवाई करत फोन लावला. भावाने रिझवान आणि भय्यू यांना बोलावलेल्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
सपनाने घटनेची दिवशी दाल-बाटी बनवली होती. तिने पतीच्या जेवणात झोपेच्या 5 गोळ्या मिसळल्या. ते खाल्ल्यानंतर पती बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपी महिलेने रिजवान आणि भय्यू यांना बोलावले. दोघांनी त्याला बेशुद्धावस्थेत मारले. त्यांचे हात पाय कापून पोत्यांमध्ये भरले. यावेळी त्यांच्या मुलानेही त्यांना मदत केली. धड प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरले. त्यानंतर मजुरांना बोलावून सहा फूट खड्डा खोदण्यात आला. धड पोत्यात टाकून खड्ड्यात टाकून पुरले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.