Crime News: आई-वडिलांसमोरच केली पत्नीची हत्या, मग मृतदेह जंगलात फेकला, ब्लाईंड मर्डर मिस्ट्रीचा पोलिसांनी असा छडा लावला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 11:13 PM2022-01-27T23:13:55+5:302022-01-27T23:15:11+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. येथे हुंड्यासाठी एका नवविवाहित तरुणीची हत्या करण्यात आली. तिच्या हत्येनंतर अपहरण झाल्याचे नाटक रंगवण्यात आले. मात्र जेव्हा पोलिसांनी या ब्लाईंड मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला तेव्हा मृत महिलेचा पती आणि सासू-सासरे गजाआड गेले.
गाझियाबाद - उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. येथे हुंड्यासाठी एका नवविवाहित तरुणीची हत्या करण्यात आली. तिच्या हत्येनंतर अपहरण झाल्याचे नाटक रंगवण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनाही ते खरे वाटले. मात्र जेव्हा पोलिसांनी या ब्लाईंड मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला तेव्हा मृत महिलेचा पती आणि सासू-सासरे गजाआड गेले.
ही धक्कादायक घटना गाझियाबादमधील विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे अत्यंत भयानक पद्धतीने हे हत्याकांड घडवले गेले. एका नवविवाहितेची पतीने हत्या केली. मत तिच्या मृतदेहाचे आई-वडिलांसमोरच तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे नदी आणि जंगलामध्ये फेकले. त्यानंतर या नराधम पतीने पोलीस आणि सासरच्या मंडळींपासून वाचण्यासाठी पत्नीचे अपहरण झाल्याचा बनाव रचला.
२४ वर्षीय रिया जैन हिचा विवाह १० महिन्यांपूर्वी गाझियाबादमधील सिद्धार्थ विहार येथील आकाश त्यागी याच्याशी झाला होता. तो पेशाने इंजिनियर होता. आकाश आणि रिया एकमेकांवर प्रेम करायचे. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचे लग्न लावून दिले होते. मात्र लग्नानंतर आकाशच्या कुटुंबीयांनी खरे रंग दाखवले. ते हुंड्यासाठी रियाला त्रास देऊ लागले.
अखेर लग्नाच्या दहा महिन्यांनंतरच हुंड्यापायी पती आणि सासरच्या मंडळींनी रियाची गळा कापून हत्या केली. तसेच तिचा मृतदेह दोन तुकडे करून नदी आणि जंगलामध्ये फेकून दिला. हत्येच्या या घटनेनंतर आकाश आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा कट रचला.
त्यानुसार रियाचा पती असलेल्या आकाशने पोलिसांना ११२ नंबरवर फोन करून त्याच्या पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपासाला सुरुवात केली. यादरम्यान पोलीस तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली. पलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती आणि सासू-सासऱ्यांनीच रियाचे डोके धडापासून वेगळे करून तिची हत्या केली. मात्र पोलिसांना तिचे अपहरण झाल्याची माहिती दिली. रियाच्या भावाने कुणाकडून तरी कर्ज घेतले होते. काही जण घरी आले आणि त्यांनी तिचे अपहरण करून घेऊन गेले, असा दावा त्यांनी केला होता. मात्र आपण केलेला गुन्हा कधीच उघडकीस येणार नाही. तसेच तिचा मृतदेहही कुणाला सापडणार नाही, अशी आरोपींना खात्री होती.
याबाबत सीओ स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले की, अपहरणाच्या तक्रारीनुसारा आम्ही तपासास सुरुवात केली तेव्हा आम्हाला अनेक कच्चे दुवे दिसून आले. त्यानंतर सर्व्हिलान्स आणि मेन्युअल इंटेलिजन्सच्या आधारावर आम्ही याचा शोध घेतला. अखेरीस रियाचा पती आकाश त्यागी, त्याचे वडील सुरेश त्यागी आणि आई उषा त्यागी यांना अटक केली.