उत्तर प्रदेशामध्ये पोलीस कोठडीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 09:07 AM2021-11-11T09:07:25+5:302021-11-11T09:15:54+5:30
Crime News : कासगंज येथील पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशामधील कासगंज येथील पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तरुणावर एका मुलीसोबत पळून गेल्याचा आरोप असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांत तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलाच्या मृत्यूला आत्महत्या म्हटलं आहे. मात्र कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचं म्हणत गंभीर आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
चांद मियां असं मृत तरुणाचं नाव असून तो सदर कोतवाली परिसरातील नागला सय्यद अहरोली येथील रहिवासी होता. त्याच परिसरातील एका तरुणीला घरातून पळवून नेण्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर केला होता. त्यामुळेच पोलिसांनी त्याला अधिकच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चांद मियांचे वडील अल्ताफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी सोमवारी संध्याकाळी माझ्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. अवघ्या 24 तासांनंतर मला माहिती मिळाली की त्याने गळफास लावून घेतला आहे"
तरुणाने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "चौकशीदरम्यान चांद मियांने शौचालयात जायचे असल्याचे सांगितले. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने पोलीस कर्मचार्यांनी चौकशी केली असता तो शौचालयातील पाईपला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. चांद मियांने टोपी असलेलं एक जॅकेट घातलं होतं आणि त्याला दोरी होती. त्या दोरीने त्याने तिथे असलेल्या पाईपला गळफास लावून घेतला." घटनेनंतर एसपी रोहन प्रमोद बोत्रे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तरुणाला तातडीने रुग्णालयात नेले असता काही काळ उपचार केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे बोत्रे यांनी सांगितले.
पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा
प्राथमिक तपासात पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. चांद मियांने त्याच्या टोपीच्या वापर करून स्वतःला फासावर लटकवले होते या पोलिसांच्या सांगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासासाठी अद्याप समोर आलेले नाही. काँग्रेससह विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.