खळबळजनक! 2 महिन्यांचा पगार मागितला म्हणून मालक संतापला, तरुणाला जिवंत जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 04:01 PM2021-12-27T16:01:42+5:302021-12-27T16:04:06+5:30
Crime News : दोन महिन्यांपासून थकलेला पगार घेऊन नोकरी सोडण्याबाबत तरुणाने सांगितलं होतं. मात्र मालक त्याला पैसे देत नव्हता.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पगार मागितला म्हणून तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे हा संतापजनक प्रकार घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विकास राम असं या तरुणाचं नाव असून तो मोबाईलच्या दुकानात नोकरी करत होता. दोन महिन्यांपासून थकलेला पगार घेऊन नोकरी सोडण्याबाबत तरुणाने सांगितलं होतं. मात्र मालक त्याला पैसे देत नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यातील दानापूर येथील बेऊर पोलीस ठाण्याअंतर्गत सिपारा आयओसी रोडवर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी रास्ता रोको करत गोंधळ घातला आणि मोबाईलच्या दुकानाचीही तोडफोड केली. आरोपीला पकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर बळाचा वापर करत लाठीचार्ज करुन नागरिकांना घटनास्थळावरून हटवण्यात आले, तर तरुणाचा मृतदेह नातेवाईकांसोबत पाठवून दिला.
विकासचा दोन-तीन महिन्यांचा पगार झाला नव्हता
सिपारा भागात राहणाऱ्या रविंद्र राम यांचा मुलगा विकास राम मोबाईलच्या दुकानात काम करत होता. दुकानाचा मालक आदर्श कुमार आणि कर्मचाऱ्यांनी विकासची हत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. 18 डिसेंबरला ही हत्या झाल्याची माहिती आहे. रविंद्र राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास आदर्श कुमारच्या दुकानात नोकरी करायचा. विकासचा दोन-तीन महिन्यांचा पगार झाला नव्हता. थकित पगार द्या, मी नोकरी सोडतो, असं विकास म्हणाला. विकासने पैसे मागितल्यावर आदर्शने त्यालाच पेट्रोल आणायला सांगितलं.
दुकानाचीही तोडफोड करुन जाळपोळ
विकास पेट्रोल घेऊन आल्यावर मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना विकासला धरायला सांगितलं. त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल शिंपडून पेटवून दिलं, असा दावा विकासचे पिता रविंद्र राम यांनी केली आहे. जळलेल्या अवस्थेत विकासला पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर स्थानिकांनी विकासचा मृतदेह सिपारा येथील मोबाईल शॉपजवळ आणून रस्ता जाम केला आणि गोंधळ घातला. दुकानाचीही तोडफोड करुन जाळपोळ केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,