‘क्राइम पेट्रोल’च्या निर्मातीचीच झाली फसवणूक; ऑडी उधार घेत ठेवली गहाण, नेमकं काय घडलं? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 11:30 AM2022-08-21T11:30:21+5:302022-08-21T11:33:12+5:30
मालाड पोलिसांनी गुरुवारी बॉलिवूड अभिनेता आणि लेखक झिशान कादरी याच्यावर “क्राइम पेट्रोल डायल १००” च्या निर्मातीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
मुंबई :
मालाड पोलिसांनी गुरुवारी बॉलिवूड अभिनेता आणि लेखक झिशान कादरी याच्यावर “क्राइम पेट्रोल डायल १००” च्या निर्मातीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गँग्स ऑफ वासेपूरचे सह-लेखन करणाऱ्या अभिनेत्याने कथितपणे संबंधित निर्मातीची ३८ लाख किमतीची ऑडी कार उधार घेतली आणि एक वर्षापासून तिचे कॉल चुकवून ती १२ लाखांसाठी गहाण ठेवली असा त्यांच्यावर आरोप आहे.
निर्माता राजबाला ढाका चौधरी (वय ४४) या मालाड येथे राहतात. त्यांचे दोन मुलगे समीर आणि साहिल व भावासोबत शालिनी प्रॉडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांनी २०१७ मध्ये सोनी टेलिव्हिजनसाठी डायल १०० (गुन्हे मालिका) ही मालिका तयार केली. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी त्यांनी ऑडी कार खरेदी केली. चौधरी यांनी मालाड पोलिसांना सांगितले की, २०१८ मध्ये “डायल १००”च्या शूटिंगदरम्यान त्या कादरी आणि “फ्रायडे-टू-फ्रायडे एंटरटेनर्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड”चे मालक असलेल्या त्याच्या पत्नीला भेटल्या. चौधरी यांनी सांगितले की, तिने त्यांच्यासोबत क्राईम पेट्रोल मालिका आणि हलहल नावाच्या चित्रपटात काम केले, ज्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मालाड पोलिसांना दिलेल्या निवेदनात चौधरी यांनी सांगितले की, २२ जून २०२१ रोजी काद्री त्यांच्या घरी आला आणि त्यांचा मुलगा समीरला कॉमेडी शो तयार करण्याची ऑफर दिली, जी सब टीव्हीवर प्रसारित केली जाणार होती. त्यानंतर कादरीने चौधरी यांना शोच्या निर्मितीसाठी भागीदारीची ऑफर दिली. त्यांनी मालिकेची निर्मिती करत त्यासाठी वित्तपुरवठा करण्याची तयारी दर्शविली.
फोन उचलला नाही, व्यस्त असल्याचा बहाणा
शोबाबत तपशिलावर चर्चा केल्यानंतर कादरीने चौधरी यांना सांगितले की, तो चॅनल प्रमुख, शो डायरेक्टर आणि कलाकारांसोबत अनेक बैठकांना उपस्थित राहणे आवश्यक आहे, ज्यासाठी त्याला कारची आवश्यकता असेल. “त्याने माझी ऑडी कार उधार मागितली आणि माझा त्याच्यावर विश्वास असल्याने काही दिवसांसाठी ती देण्याचे कबूल केले. एक महिन्यानंतर चौधरी यांनी कादरीकडे गाडी परत मागितली. त्याला सतत फोनही केले. मात्र, तो फोन उचलत नव्हता आणि तो हायकोर्टात किंवा मीटिंगमध्ये व्यस्त असल्याचा बहाणा करू लागला. वर्षाहून अधिक काळ होऊनही त्याने कार परतवली नाही. नंतर कादरीने ती मैत्रिणीकडे १२ लाखांसाठी गहाण ठेवल्याचे चौधरींना समजले.