क्राईम पेट्रोल पाहून सराफास लुटणाऱ्या तोतया पोलिसांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 09:33 PM2018-12-22T21:33:26+5:302018-12-22T21:34:56+5:30
तुमच्याकडे दुकानाचे परवाना नाही अशी दमदाटी करत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा अभिनय दोघे उत्तम करीत होते. तेवढय़ात तेथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने त्यांचे पितळ उघडे पाडले आणि पायधुनी पोलिसांनी दोघे भामटे गजाआड केले.
मुंबई - गुन्हेगारीवर आधारित क्राइम पेट्रोल ही मालिका बघून दोन भामट्यांनी एक अनोखी शक्कल लढवली आणि भाड्याने पोलिसांचे दोन ड्रेस घेतले आणि ते घालून सोन्याचे दागिने बनविण्याच्या एका दुकानात घुसले. तुमच्याकडे दुकानाचे परवाना नाही अशी दमदाटी करत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा अभिनय दोघे उत्तम करीत होते. तेवढय़ात तेथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने त्यांचे पितळ उघडे पाडले आणि पायधुनी पोलिसांनी दोघे भामटे गजाआड केले.
हर्ष उमेश सकारिया (30) आणि हुसेन शेख (34) अशी या दोघा भामटय़ांची नावे आहेत. पायधुनी परिसरातील सारंग मार्गावर असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अमितेश चुनीचरण (33) याचा सोन्याचे दागिने बनविण्याचा गाळा आहे. हर्ष आणि हुसेन दोघेही पोलिसांची वेशभूषा करून अमितेशच्या गाळय़ात घुसले आणि तुझ्याकडे दुकानाचे परवाना नाही हा विषय काढून चर्चा सुरू केली. दरम्यान, गाळय़ाबाहेरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने दोघांना पाहिले आणि हे पोलीस नसल्याचे त्याने अमितेशला सांगितले. आपली पोलखोल झाल्याचे कळताच सकारिया याने तेथून लगेच पळ काढला, तर हुसेनला तेथील लोकांनी पकडून पायधुनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 16 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता तेव्हापासून सकारिया फरार होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. अखेर 17 डिसेंबरला हर्ष सकारिया याच्यादेखील आम्ही मुसक्या आवळल्या असे पायधुनी पोलिसांनी सांगितले.