अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 08:06 PM2018-10-12T20:06:18+5:302018-10-12T20:07:06+5:30
बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट आणि इतर साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. राठोड आणि आरोपींची २०१५ साली ओळख झाली होती...
पुणे : बांधकामासाठी लागणारे साहित्य पुरविणा-या व्यापा-याची २ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मतकर यांनी दिले आहेत. निखील विनोद कुंकुलोळ (रा. मार्केटयार्ड) आणि गौरव दिनेशकुमार सोनी (वय २८, रा. हडपसर) यांच्या गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी राजेश मोहनलाल राठोड (रा. मार्केटयार्ड) यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, राठोड यांचा बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट आणि इतर साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. राठोड आणि आरोपींची २०१५ साली ओळख झाली होती. त्यानंतर आरोपींनी राठोड यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून बांधकामासाठी लागणारे २ कोटी ५० लाख रुपयांचे साहित्य उधारीवर नेले. अनेक दिवस गेल्यानंतरही आरोपींनी पैसे न दिल्याने राठोड यांनी त्यांच्याकडे पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे राठोड यांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी आरोपींनी पैसे देतो असे सांगून राठोड यांना २ कोटी ५० लाख रुपयांचे चेक दिले. तसेच समजुतीचा करारनामा करून दिला. एका वर्षांत पैसे देतो, असे आरोपींनी त्यावेळी कबूल केले होते. मात्र ठरलेल्या मुदतीत पैसे परत केले नाही. त्यामुळे राठोड यांनी अॅड. हेमंत झंजाड, अॅड. ओंकार उकरंडे यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सर्व पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींवर गुन्हा दाखल करावा, असा आदेश स्वारगेट पोलिसांना दिला आहेत.