एसीबीच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल: लाचेच्या गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:21 PM2019-12-24T22:21:51+5:302019-12-24T22:23:22+5:30
महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवून एसीबीच्या एका पोलीस निरीक्षकाने अडीच लाखांची लाच मागितली. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी नागपूर एसीबीत कार्यरत पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवून एसीबीच्या एका पोलीस निरीक्षकाने अडीच लाखांची लाच मागितली. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी नागपूर एसीबीत कार्यरत पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे एसीबीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
भूमापन कार्यालयातील आश्रय मधुकर जोशी (वय ४०) नामक आरोपीविरुद्ध एक लाखाची लाच मागण्याच्या आरोपावरून एसीबीने १५ नोव्हेंबरला जोशीला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पंकज उकंडे याच्याकडे होता. तपास करताना उकंडे जोशीच्या कार्यालयात जायचा. तेथील महिला अधिकारी (तक्रारदार) हॉटेल हेरिटेजच्या मागे राहतात. तो त्यांच्या घरीही गेला होता. त्यांच्यासोबत गुन्ह्याच्या संबंधाने चर्चा करताना त्या घाबरत घाबरत बोलत असल्याने उकंडेने त्यांच्याकडून रक्कम उकळण्यासाठी डाव टाकला. तुम्हाला या गुन्ह्यात जोशीसोबत सहआरोपी करणार आहोत, असा त्याने धाक दाखवला. जर तुम्हाला गुन्ह्यात आरोपी व्हायचे नसेल तर त्यासाठी दोन लाखांची लाच द्यावी लागेल, असे उकंडे म्हणाला. दुसरे म्हणजे, जोशी याचा पीसीआर वाढविला तर तो तुमचे नाव घेईल आणि नंतर प्रकरण हाताबाहेर जाईल. त्यामुळे त्याचा पीसीआर न वाढवण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली.
जोशीच्या गुन्ह्यात कसलाही संबंध नसताना उगाच धाक दाखवून अडीच लाख रुपयांची लाच मागितल्या जात असल्याने महिला अधिकाऱ्याने आपल्या एका निकटस्थताच्या मदतीने एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अप्पर अधीक्षक राजेश दुद्धलवार यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे १६ नोव्हेंबरला उकंडेची त्यांनी तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उकंडेविरुद्ध कारवाईच्या मंजुरीसाठी स्थानिक वरिष्ठांकडून एसीबीच्या मुंबई मुख्यालयात प्रकरण पाठविण्यात आले. सोमवारी तेथून कारवाईची परवानगी मिळाली. त्यानुसार एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांनी मंगळवारी सदर पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस निरीक्षक उकंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. कारवाईची कुणकुण लागताच उकंडे फरार झाला. एसीबीच्या पथकाने त्याच्या त्रिमूर्तीनगरातील घरी झाडाझडती घेतली. मात्र, फारसे काही मिळाले नाही. उकंडेचा शोध घेतला जात आहे.
दोन वर्षे, दुसरा गुन्हा !
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची दोन वर्षांतील ही दुसरी घटना होय. यापूर्वी एसीबीचे तत्कालीन अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यावर असाच गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे नागपूर एसीबीच्या कार्यालयाभोवती संशयाचे वलय निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, त्याहीवेळी सदर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल झाला होता अन् याही वेळी सदर ठाण्यातच गुन्हा दाखल झाला आहे.