पत्रकार, आरटीआय कार्यकर्ता, बडतर्फ पोलिसांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 04:40 PM2020-07-07T16:40:15+5:302020-07-07T18:59:56+5:30
खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्याबदल्यात २ कोटी रुपये व रास्ता पेठेतील जागा देण्याची खंडणी मागितल्याची बांधकाम व्यावसायिकाची तक्रार..
पुणे : मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेऊन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्याबदल्यात २ कोटी रुपये व रास्ता पेठेतील जागा देण्याची खंडणी मागितल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी पत्रकार, आरटीआय कार्यकर्ता,बडतर्फ पोलीस कर्मचारी आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश हरिभाऊ जगताप, पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, आरटीआय कार्यकर्ते रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे, अमोल सतीश चव्हाण (सर्व रा. पुणे) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर वसंत कर्नाटकी (वय ६४, रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०१९ मध्ये घडला होता. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेने यापूर्वी जानेवारी महिन्यात सुधीर कर्नाटकी यांच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा व जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप केला असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर कर्नाटकी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या महिलेने त्यांच्याशी असलेल्या संबंधाचा गैरफायदा घेतला. ही महिला व सुधीर कर्नाटकी यांच्या संयुक्त नावाने असलेला बावधन येथील फ्लॅट या महिलेने जबरदस्तीने स्वत:च्या नावावर करुन घेतला. माझी सुपारी देऊन मारण्याची धमकी दिल्याने मी घाबरुन फ्लॅट नावावर करुन दिला. त्यानंतर या महिलेने रवींद्र बराटे हे आरटीआय कार्यकर्ते असून त्यांचे राजकीय संबंध चांगले आहेत. शैलेश जगताप हा पोलीस असून त्यांचा चांगला वट आहे, कोणताही खोटानाटा गुन्हा दाखल करुन माझे जीवन उद्धवस्त करेल, अशी धमकी दिली. माझ्या इच्छेविरुद्ध करारनाम्याद्वारे खंडणी रुपाने फ्लॅट दिला. तसेच ८ हप्त्याने ६ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर त्यांनी तुम्हाला २ कोटी रुपये व रास्ता पेठेची जागाही द्यावी लागेल अशी धमकी दिली. देवेंद्र जैन अथवा शैलेश जगताप यांच्याशी बोलून घ्या ते रवींद्र बराटे यांच्याशी बोलतील, असे या महिलेने सांगितले. त्यानंतर वाटेत अमोल चव्हाण याने मॅडमने सांगितल्याप्रमाणे दोन कोटी रुपये द्यावे लागतील असे धमकावले. मी देवेंद्र जैन यांच्या विजय टॉकिज येथील ऑफिसमध्ये जाऊन भेटलो. त्यांनी तुमच्या पार्टनरलाही बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू. रवींद्र बऱ्हाटे कोणाला भेटत नाही. तुझ्याविरुद्ध बलात्काराची बातमी माझे वेबपोर्टलवर छापून व व्हायरल करुन तुझे जगणे मुश्लिक करु शकतो, असे धमकाविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कर्नाटकी यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलिसांनी ३८६, ३८८, ३८९, ५०६(२), १२० (ब), ३४ खाली गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या महिलेच्या वतीने अॅड. विजय ठोंबरे यांनी सांगितले की, माझ्या अशिलाच्या फिर्यादीवरुन हिंजवडी पोलिसांनी सुधीर कर्नाटकी यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे़. बलात्काराचा गुन्हा काढून घेण्यासाठी त्यांनी हा खोटा गुन्हा नोंदविला आहे.