पिंपळे गुरव येथे रस्त्याचे काम बंद पाडल्याने सात जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 07:06 PM2019-01-30T19:06:28+5:302019-01-30T19:07:18+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे पगारे रुग्णालयासमोरील रस्त्याचे काम सुरू आहे.
पिंपरी : रस्ता विकसित करण्याचे काम सुरु असताना महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासोबत वाद घालत रस्त्याचे काम बंद पाडले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विजय चंद्रकांत कांबळे (वय ४५) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रभावती सुदाम जाधव (वय ६३), शिला अशोक आंबेकर (वय ६५), मिना पांडुरंग दळवी (वय ४५) अंजुम रशिद शेख (वय ४०), पांडुरंग बाबुराव दळवी (वय ५३), अभय अशोक आंबेकर (वय २८) अक्षय पांडुरंग दळवी (वय २३ सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे पगारे रुग्णालयासमोरील रस्त्याचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आरोपींनी कामाच्या ठिकाणी जाऊन अभियंत्यासोबत वाद घातला. तसेच रस्त्याचे सुरु असलेले काम बंद पाडले. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून सांगवी पोलिस पुढील तपास करत आहेत.