पिंपळे सौदागर येथील ऑनर किलिंगप्रकरणी सहा जणांवर गुन्हा; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:32 PM2020-06-09T14:32:59+5:302020-06-09T14:34:51+5:30
प्रेमप्रकरणातून काही जणांनी एका तरुणावर हल्ला करत त्याचा खून केला होता..
पिंपरी : प्रेमप्रकरणातून काही जणांनी एका तरुणावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. ७) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
विराज विलास जगताप (रा. पिंपळे सौदागर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहीत जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे, अशी आरोपींची नावे आहेत. तर यातील आरोपी हेमंत काटे व सागर काटे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जितेश वसंत जगताप (वय ४४, रा. जगतापनगर, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवारी (दि. ८) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या विराज हा एका तरुणीवर प्रेम करीत होता. त्या कारणावरून आरोपी यांनी रविवारी (दि. ७) रात्री दहाच्या सुमारास जमाव जमवून छोट्या टेम्पोने विराज याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे विराज खाली पडला. त्यानंतर तो पळूज जात असताना आरोपी टेम्पोमधून उतरले. त्यांनी विराज याच्या डोक्यात लोखंडी रॉड व पाठीत दगड मारला. त्यानंतर जातीवाचक बोलले. तुझी लायकी आहे का मुलीवर प्रेम करायची, तरी तू प्रेम करतोस, असे म्हणून आरोपी त्याच्या अंगावर थुंकला.
गंभीर जखमी झाल्याने विराज बेशुद्ध झाला. त्यानंतर उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.