'बर्थडे सेलिब्रेशन'भोवले; खेड तालुक्यात महिला उपसरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 12:59 PM2020-08-06T12:59:37+5:302020-08-06T13:01:39+5:30
सोशल मीडियावर वाढदिवसाचे सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडिओ केले व्हायरल
राजगुरुनगर: पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना नागरिकांसह लोकप्रतिनिधींना मात्र अजून परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे चित्र उघड करणारी एक घटना खेड तालुक्यात समोर आली आहे. शिरोली या गावात कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आला आहे. तसेच ह्या गावात सध्या कोरोनाचे दहा रुग्ण आहे. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा गावातील महिला उपसरपंचाने सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवून ग्रामपंचायत कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
जया काळूराम दसगुडे असे या उपसरपंच महिलेचे नाव आहे.त्यांच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित महिला उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहकारी पण विरोधक असलेल्या माजी उपसरपंचासह ६ सदस्यांनी या महिला उपसरपंचा विरुद्ध गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच १८८ कलम अंतर्गत त्यांच्यावर खटला आला असल्याचे पोलिस हवालदार बापुसाहेब थिटे यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली गावच्या उपसरपंच महिलेने सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
विशेष म्हणजे या वाढदिवस कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुध्दा सहभागी झाले होते. गावात कोरोनाची लागण झालेले १० रुग्ण झाल्याने भीतीदायक वातावरण होते.अशातच उपसरपंच दसगुडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात काहींनी मास्क घातलेला तर काहींनी ना घालताच उपस्थिती लावल्याचे समोर आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा केल्यानंतर माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, सदस्य गणपत थिगळे,विजय सावंत,संदीप वाडेकर, सोनल सावंत , उर्मिला सावंत यांनी गटविकास अधिकारी जोशी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना नियमावली लागु असताना जबाबदार पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने केलेल्या वाढदिवस गावात चर्चेचा विषय बनला आहे.