बँड, बाजा, बारात काढत डीजेवर थिरकणे नवरदेवाला पडले महागात; मोराची चिंचोली येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 06:46 PM2020-06-27T18:46:39+5:302020-06-27T19:06:03+5:30
विनामास्क डीजेवर थिरकणे एका नवरदेवाला चांगलेच महागात पडले
शिरूर : शासनातर्फे अनलॉक सुरू करण्यात आले असले तरी त्यासाठीही नियम घालण्यात आले आहेत. मात्र, हे नियम डावलून बॅड, बाजा, वरात काढत विनामास्क डीजेवर थिरकणे एका नवरदेवाला चांगलेच महागात पडले. नवरदेवाचा व्हिडिओ व्हयरक झाल्यावर नवरा-नवरीच्या आई-वडिलांस २० ते २५ वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे शनिवारी ही घटना घडली.
मोराची चिंचोली येथे गुरूवारी (दि २५) गणेश आप्पासाहेब थोपटे यांचे लग्न होते. कोरोनामुळे लग्नसमारंभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम आणि अटी घातल्या आहेत. लग्न समारंभात फक्त ५० लोकांंना परवानगी दिली आहे. याशिवाय मास्क, सॅनिटायझर वापरायला सांगितले आहे. मात्र असे असताना या कुटुंबाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे तपासात पुढे आले आहे.
या लग्नात कोणीही मास्क वापरला नाही. कोणतेही वाद्य वाजवण्याची परवानगी घेतली नाही. असे असतानाही वरात काढत नवरदेवासह त्याची मित्रमंडळी डीजेवर थिरकली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शिरूर पोलिसांनी याची दखल घेत नवरा मुलगा व नवऱ्यामुलीचे आई वडील यांच्यासह २० ते २५ लोकांच्या विरोधात शिरुरपोलिसात शुक्रवारी (दि. २७) गुन्हा दाखल केला आहे. यापुढे लग्न समारंभ साजरा करताना होणारी कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिरुर पोलिस निरीक्षक प्रविण खानापूरे यांनी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पालवे करित आहेत.