शिवसेना नागपूर शहर प्रमुख मंगेश कढव विरुद्ध हप्ता वसुलीचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 09:03 PM2020-06-30T21:03:04+5:302020-06-30T23:36:48+5:30
शिवसेनेचा शहर प्रमुख मंगेश कढव याची उलटी गिनती सुरू झाली आहे. राजकारणाबरोबरच गुन्हेगारीत सक्रिय असलेला कढव विरोधात अंबाझरी व सक्करदरा ठाण्यात हप्ता वसुली प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेचा शहर प्रमुख मंगेश कढव याची उलटी गिनती सुरू झाली आहे. राजकारणाबरोबरच गुन्हेगारीत सक्रिय असलेला कढव विरोधात अंबाझरी व सक्करदरा ठाण्यात हप्ता वसुली प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस सक्रिय झाल्याची चाहूल लागताच कढव फरार झाला आहे.
हैदराबाद येथील विक्रम लाभे यांनी २०१२ मध्ये भरतनगर येथील पुराणिक ले-आऊटमध्ये बंगला खरेदी केला होता. नागपुरात आल्यानंतर ते बंगल्यात राहत होते. बंगल्यामध्ये दागिने, रोख, फर्निचर व काही सामान होते. एक वर्षापूर्वी मंगेश कढव याने तीन साथीदाराच्या मदतीने कुलूप तोडून बंगल्यावर कब्जा केला. बंगल्यातील आलमारीतून रोख व दागिन्यासह पाच लाख रुपयांचा माल चोरून नेला. याची माहिती लाभे यांना मिळाली. ते बंगल्यात आल्यावर कढव याने साथीदाराच्या मदतीने त्यांना डांबून ठेवत, बंगल्यावरील कब्जा काढण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणी लाभे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. परंतु पोलिसांकडून कुठलीही कारवाई झाली नाही. कढवला पोलिसांचा पाठिंबा असल्याने कढव याने बंगल्यावर कब्जा केला. दुसरे प्रकरण दुकानाच्या विक्रीच्या नावावर वसुलीचे आहे. रघुजीनगर येथील बिल्डर देवानंद शिर्के याने २०१३ मध्ये कढव याच्याकडून दुकानाचा सौदा केला. शिर्के यांनी त्याला रोख व चेक असे १८ लाख रुपये दिले. उर्वरित ३.५० लाख रुपये देऊन रजिस्ट्री करायची होती. शिर्के रजिस्ट्रीसाठी चकरा मारत होते. कढव त्यांना टाळत होता. कढवने दुकानाच्या नावावर बँकेतून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती शिर्केला मिळाली. शिर्के यांनी रजिस्ट्री कर, अथवा पैसे परत देण्यास सांगितले. मात्र त्याने शिर्केकडूनच २० लाखाची मागणी केली. पैसे न दिल्यास कुटुंबासह जीवाने मारण्याची धमकी दिली. दोन्ही पीडित बऱ्याच वर्षापासून पोलीस ठाण्याच्या चकरा मारीत होते. काही दिवसापूर्वी शिवसेनेचा कार्यकर्ता अशोक धापोडकर याने कढव विरुद्ध बजाजनगर ठाण्यात २५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. पोलीस आयुक्तांनी कढवशी संबंधित तक्रारीचा तपास गुन्हे शाखेकडे दिला. गुन्हे शाखा सतर्क झाल्याबरोबरच अंबाझरी व सक्करदरा पोलिसांनी कढव विरुद्ध गुन्हे दाखल केले. गुन्हे शाखेने सोमवारी कढवचा शोध घेतला. परंतु तो फरार झाला.
बिल्डरने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
सूत्रांच्या मते देवा शिर्के ने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने सुसाईड नोटमध्ये कढवबरोबरच आरोपींकडून प्रताडित करण्यात येत असल्याचा उल्लेख केला होता. या प्रकरणातही पोलिसात तक्रार करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. शहरात मंगेश कढवकडून त्रास देण्यात येत असलेल्यांची संख्या भरपूर आहे. तो अनेक वर्षांपासून हप्ता वसुली व जमिनीवर अवैध कब्जा, फसवणूक करीत आहे. रामदासपेठेतील एका हॉटेलच्या कब्जामध्येसुद्धा त्याचा हात होता.
शिवसेनेचा दाखवत होता धाक
लोकांना कंगाल करून कढव पैशात लोळत होता. मर्सिडिज कारमध्ये फिरत होता. त्याने लाभेच्या बंगल्यात दुसºया पत्नीला ठेवले होते. ती महिला डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे. या बंगल्याची व खासगी फ्लॅटची गुन्हे शाखेने तपासणी केली आहे. तो शिवसेनेचा नेता असल्याचा धाक दाखवीत होता. मुंबईमध्ये डान्स बारमध्ये पार्ट्या करीत होता. त्याच्याविरुद्ध मुंबईतही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कढवची गंभीरतेने चौकशी केल्यास अनेक प्रकरणे पुढे येण्याची शक्यता आहे.
आयुक्तांनी दिले कारवाईचे निर्देश
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हे शाखेला कढव प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी संतोष आंबेकर, रोशन शेख, प्रीती दास प्रकरणात आयुक्त व गुन्हे शाखेची ‘क्लीन इमेज’ समोर आली आहे.