नागपुरातील गुन्हेगारी ठेचली, गंभीर गुन्ह्यात घट : पोलीस आयुक्तांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 10:40 PM2020-01-06T22:40:52+5:302020-01-06T22:42:08+5:30

उपराजधानीला गुन्हेगारमुक्त शहर बनविण्यासोबतच शहर पोलीस दल हेल्दी बनवायचे आहे, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला.

Crimes crushed, serious crime reduced in Nagpur: Police Commissioner claims | नागपुरातील गुन्हेगारी ठेचली, गंभीर गुन्ह्यात घट : पोलीस आयुक्तांचा दावा

नागपुरातील गुन्हेगारी ठेचली, गंभीर गुन्ह्यात घट : पोलीस आयुक्तांचा दावा

Next
ठळक मुद्देपोलिसांना हेल्दी बनवायचेय





लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीला गुन्हेगारमुक्त शहर बनविण्यासोबतच शहर पोलीस दल हेल्दी बनवायचे आहे, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. २०१९ मध्ये नागपुरातील गुन्हेगारी आणि पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी पोलीस जिमखान्यात आयोजित पत्रकार परिषदेत ठेवला. यावेळी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर उपस्थित होते.
डॉ. उपाध्याय म्हणाले, उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढण्यात आणि गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात शहर पोलिसांनी यश मिळवले आहे. शहरातील ‘टॉप - २०’ गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांना कारागृहात डांबले. त्यामुळे अनेक गुन्हेगारांनी बाहेर पळ काढावा लागला आहे. यापुढे गुन्हेगारी नियंत्रणासोबतच हेल्दी पुलिसिंगवरही भर देण्याला आपण भर देणार असल्याचे ते म्हणाले.
मोक्का कारवाईत राज्यात नागपूर पोलिसांनी ‘नंबर वन' स्थान मिळवले. गंभीर स्वरूपाचे वारंवार संघटीतपणे गुन्हेकरणा-या कुख्यात गुंडांच्या तब्बल १३ टोळ्यांविरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आली. त्यातून ६५ कुख्यात गुंडांवर लगाम कसण्यात आला. तडीपारी, मपीडीएच्या कारवाईमध्येही वाढ करण्यात आली. एमपीडीए अंतर्गत ३३ गुंडांना मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील सर्वच मोठे आणि कुख्यात गुंड सध्या कारागृहात पडले आहेत. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडी, प्राणांतिक अपघात अशा गुन्ह्यांसह बलात्कार, विनयभंग, खंडणी वसुली तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही घट झाली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ८६३ गुन्हे कमी घडले. हा धडाका यापुढेही सुरूच राहिल, असे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.

बंदूक अन् बुलेट
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी उपराजधानीत शस्त्रांची तस्करीसंबंधीचे गुन्हे वाढल्याचे मान्य केले. ते कमी करण्यासाठी गुन्हे शाखेने प्रयत्न चालविले असून, गतवर्षी ३१ गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. ज्यात ४१ आरोपींना बंदुकीसह अटक केली. तसेच ३४ पिस्तूल आणि ५२ काडतूस पोलिसांनी जप्त केल्याचे सांगितले. जप्त केलेल्या अग्निशस्त्रांमध्ये सर्वाधिक १७ विदेशी बनावटीचे पिस्तूल, १० देशी कट्टे, २ माऊजर, २ रायफल आणि ३ रिव्हॉल्वरचा समावेश आहे. शहरात अग्निशस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष योजना आखल्याचेही त्यांनी सांगितले.

हेल्थ कार्ड देणार !
कामाचा ताण आणि सततची दगदग यामुळे पोलिसांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना गंभीर व्याधी होतात. ते ध्यानात आल्यामुळे
शहरात कार्यरत एएसआय ते शिपाईपदापर्यंतच्या सर्व पोलिसांची यापुढे नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना हेल्थ कार्ड
देण्यात येईल. त्यांची अ, ब, क,अशी विभागणी करण्यात येणार आहे. अ गटात निरोगी, ब गटात मधुमेह ,उच्चरक्तदाब तर क गटात हृदयविकार असलेल्या पोलिसांचा समावेश करण्यात येईल. ब आणि क गटात समावेश असलेल्या कर्मचा-यांची यादी पोली मुख्यालय, नियंत्रण कक्ष तसेच संबंधित पोलीस ठाण्यात लावण्यात येईल. क गटात असलेल्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात येऊन त्यांना बंदोबस्त अथवा तणाव असलेल्या ठिकाणी तैनात करण्यात येणार नाही. या कर्मचा-यांना पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामासाठी तैनात करण्यात येईल. पोलिसांचे आरोग्य सृदृढ राहावे यासाठीही विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. व्यायाम, योगा, समुपदेशन करूनही त्यांच्या आरोग्याला जपण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.
लाचखोरीच्या संबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नांवर बोलताना आयुक्तांनी कडक कारवाईचे सुतोवाच केले. लाचखोर, डिफॉल्टर पोलिसांना धडा शिकविल्याची उदाहरणेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितली. गुन्हा दाखल करण्यास विलंब करणे, विधी अधिका-यांकडे प्रकरण असल्याचे सांगून टाळाटाळ करण्यासह वादग्रस्त ठाणेदारांच्या कार्यशैलीचेही अनेक मुद्दे उपस्थित झाले. त्यावर लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, अशी हमी डॉ. उपाध्याय यांनी दिली.

Web Title: Crimes crushed, serious crime reduced in Nagpur: Police Commissioner claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.