मंदिरात चोरी व घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 05:34 PM2023-08-02T17:34:28+5:302023-08-02T17:35:41+5:30
आरोपीकडून गुन्हयात चोरी केलेला १ लाख ३२ हजारांचा मुदेमाल हास्तगत केला आहे. आरोपीने विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा - मंदिरात चोरी व घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.
विरारच्या फुलपाडा गाव येथील डोंगरात बारोंडा देवीचे जागृत स्थान आहे. येथील मंदिरात ५ ते ६ जून दरम्यान चोरट्यांनी मंदिरातील खिडकीचे ग्रीन तोडून आत प्रवेश करत दोन मूर्तींच्या गळ्यातील दोन मंगळसूत्र दोन नाकातील नथ व दानपेटीतील पैसे असा २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. विरार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे या गुन्हयांची लवकरात लवकर उकल करण्यासाठी वरिष्ठांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हयांचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेने सुरु केला होता.
नमुद गुन्ह्रातील आरोपीचा शोध घेण्याकरिता घटनास्थळच्या आजुबाजुच्या परिसरात तपास व मिळालेल्या माहितीच्या आधारे फुलपाडा परिसरात सलग दोन दिवस सापळा रचून आरोपी राहुल रामचंद्र पाटील (२६) याला ताब्यात घेऊन गुन्ह्याचा अनुषंगाने तपास करून मंदिराचा गुन्हा आरोपीने केल्याचे तपासात निष्पन्न केले. आरोपीकडून गुन्हयात चोरी केलेला १ लाख ३२ हजारांचा मुदेमाल हास्तगत केला आहे. आरोपीने विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी केली आहे.