Video : अंत्ययात्रेला जाण्यास बंधन घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 07:07 PM2019-05-16T19:07:31+5:302019-05-16T19:10:48+5:30
कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या दाम्पत्यांवर बहिष्कार प्रकरण
अंबरनाथ - दिड वर्षापूर्वी विवाहबध्द झालेल्या कंजारभाट समाजातील विवाहीत दाम्पत्यांनी समाजाच्या जाचक रुढींना विरोध केल्याने अंबनाथमधील त्यांच्या समाज बांधवांनी त्यांच्यावर बहिष्कार घातल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी विवेक तमायचिकर यांच्या तक्रारीवरुन कंजारभाट समाजातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपायचिकर यांच्या आजीचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेत समाज बांधवांनी न जाण्याचे आवाहन व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्या व्हिडीओच्या आधारावर या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ वांद्रापाडा परिसरातील भाट वाटी परिसरात कंजारभाट समाजाची मोठी वस्ती आहे. हा समाज आजही आपल्या समाजातील रुढी परंपरा जपत आहेत. मात्र या समाजातील कौमार्य चाचणी प्रथेला याच समाजातील विवेक तमायचिकर याने विरोध केला. पुण्यातील आपल्या पत्नीची कौमार्य चाचणीला त्याने विरोध केल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले होते. दिड वर्षापूर्वी हा प्रकार घडल्यानंतर हे प्रकरण शांत होईल अशी अपेक्षा होती. मात्र विवेक यांच्या विरोधातील समाजाचा संताप हा आजही कायम असल्याचे दिसत आहे. विवेक यांच्या आजी यांचे सोमवारी रात्री झाले. यावेळी भाटवाडी परिसरात एका हळीदीचा समारंभ सुरु होता. समाजातील ज्येष्ठ महिलेचे निधन झाल्याने हळदी समारंभातील डीजे बंद होईल अशी अपेक्षा होती. मात्र यावेळी हळदी समारंभात पंचायतीच्या सदस्याने विवेक तमायचिकर याने या पूर्वी केलेल्या समाजाच्या विरोधातील कामाचा पाढा वाचला गेला. विवेक याने देशभरात समाजाची बदनामी केली असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. विवेक याने समाजाची जी बदनामी केली आहे ती कधीही भरुन निघणारी नाही असा आरोप करित हळदी समारंभातील कार्यक्रम सुरु ठेवला. तसेच समाजाची बदनामी ज्या व्यक्तीने केली त्याच्याशी संबंध न ठेवण्याचे आणि त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेत न जाण्याचे आवाहन व्हिडीओच्या माध्यमातुन करण्यात आले होते. या व्हिडीओ नंतर काही समाज बांधवांनी अंत्ययात्रेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे विवेक तमायचिकर यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समाजाचे सरपंच संगम गारुंगे, भूषण गारुंगे, करण गारुंगे, अविनाश गागडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.