तीन शिधावाटप दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:27 PM2020-07-06T17:27:30+5:302020-07-06T17:28:26+5:30
अन्नधान्यापासून एकही पात्र शिधापत्रिकाधारक वंचित राहणार नाही याबाबतच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.
ठाणे : शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नसाचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता उप नियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ यांचे नियंत्रणाखाली १३ दक्षता पथक गठीत करण्यात आलेली असून, सदर पथकामार्फत शिधापत्रिकांच्या शिधावाटप कोणाविरुध्द प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दुकानाच्या तपासण्या घेण्यात येत आहेत. तपासणीत आढळून आलेल्या गंभीर दोषांच्या अनुषंगाने तीन अधिकृत शिधावाटप दुकानाच्या प्राधिकारपत्रधारका विरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे.
अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक ४१-फ-२८७ (वाशी) या दुकानाच्या प्राधिकारपत्रधारक श्री.श्याम बाजीराव जाधव यांनी शिधापत्रिकाधारकांना शासन निर्धारित परिमाणानुसार शिधाजिन्नस न दिल्याचे तपासणी व गृहभेटीत आढळून आल्याने दुकानाचे प्राधिकारपत्र दिनांक ०२ जुलै २०२० रोजीच्या आदेशान्वये रद्द करण्यात आले आहे.
अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक ३६-फ-१८१ (ठाणे) या दुकानाच्या प्राधिकारपत्रधारक श्री. चेतन कल्याणजी सावला यांनी यांनी शासनाने विहीत केलेल्या वेळेत दुकान उघडे ठेवत नसल्यामूळे व दुकानात मोफत तांदूळाचा साठा उपलब्ध नाही अशी चूकीची माहीती देऊन शिधापत्रिकाधारकांना शिधा जिन्नसा पासून वंचित ठेवत असल्याचे निदर्शनास आल्याने दुकानाचे प्राधिकारपत्र दिनांक ०२ जुलै २०२० रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे.
अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक ३६-फ-२१२ (ठाणे) या दुकानाच्या प्राधिकारपत्रधारक श्रीम. डायबेन अंबाजी पटेल यांनी शिधापत्रिकाधारकांना शासन निर्धारित परिमाणानुसार शिधाजिन्नस वितरीत केले नसल्याचे दुकानाच्या तपासणीत आढळून आल्याने दुकानाचे प्राधिकारपत्र दिनांक ०२ जुलै २०२० रोजीच्या आदेशान्वये रद्द करण्यात आले. दिनांक २४ मार्च २०२० रोजी पासून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी पासून ते आज पर्यंत तीन दुकानांच्या प्राधिकारपत्रधारकांविरुध्द फौजदारी गुन्हे नोंद करुन दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले. तर १३ दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित तर ७ दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आलेले आहेत.
दिनांक ०२ जुलै २०२० पासून प्राधान्य कुंटूब गटातील लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना माहे जुलै महिना नियमित अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून, माहे जून मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभा पासून वंचीत राहीलेल्या लाभार्थ्याना १० जूलै २०२० पर्यंत मोफत तांदूळ वितरीत करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत विस्थापित मजूर/ रोजंदारीवर काम करणारे मजूर व विनाशिधापत्रिकाधारक अश्या ५२७४० व्यक्तींना आतापर्यंत ४९९९.२० क्विंटल मोफत तांदूळाचे वितरण करण्यात आलेले आहे. या योजने अंतर्गत शिल्लक राहीलेल्या लाभार्थ्यांना देखील माहे मे व जून २०२० च्या वितरणास दिनांक १० जूलै,२०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अन्नधान्यापासून एकही पात्र शिधापत्रिकाधारक वंचित राहणार नाही याबाबतच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. फ परिमंडळ कार्यक्षेत्रातंर्गत येणाऱ्या सर्व शिधापत्रिकाधारकांना आवाहन करण्यात येते की, आपणास सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत कोणत्याही अडचणी असल्यास ०२२ -२५३३२६५७ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच सर्व शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानातून गर्दी न करता सोशल डिस्टसिंगचे पालन करुन शिधाजिन्नस घ्यावे असे उप नियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ, ठाणे श्री. नरेश वंजारी यांचेकडून आवाहन करण्यात करण्यात आले आहे.