कोलवाळ कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:29 PM2018-10-27T16:29:26+5:302018-10-27T16:29:55+5:30

कुख्यात गुंड मायकल फर्नांडिस याने कारागृहातून पळून जाण्याचा केलेल्या अयशस्वी प्रयत्नापासून ते कुख्यात गुंड अश्फाक बेंग्रे याचा विनायक कारभोटकर याने केलेला खून तसेच भांग प्रकरण असे विविध प्रकार कारागृहात सुरु असतानाच कैद्यांना बेकायदेशीर सवलती उपलब्ध करुन देणे अमली पदार्थाचा पुरवठा करण्याच्या प्रकारातून पुन्हा चर्चेत आले आहे. 

Criminal Jail Security Issues Again Anagram | कोलवाळ कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

कोलवाळ कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

Next

म्हापसा -  सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या सुसज्ज, सर्व सुविधा युक्त चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या कोलवाळ येथील बहुचर्चीत मध्यवर्ती कारागृहात घडत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत.   

कुख्यात गुंड मायकल फर्नांडिस याने कारागृहातून पळून जाण्याचा केलेल्या अयशस्वी प्रयत्नापासून ते कुख्यात गुंड अश्फाक बेंग्रे याचा विनायक कारभोटकर याने केलेला खून तसेच भांग प्रकरण असे विविध प्रकार कारागृहात सुरु असतानाच कैद्यांना बेकायदेशीर सवलती उपलब्ध करुन देणे अमली पदार्थाचा पुरवठा करण्याच्या प्रकारातून पुन्हा चर्चेत आले आहे. कारागृहात वारंवार घडत असलेल्या प्रकारातून घडणाऱ्या या घटनांमुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला असून घडणाऱ्या घटनांतून मात्र त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने कोणतीच उपाय योजना हाती घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसात घडलेल्या अशाच प्रकारच्या तीन प्रकरणातून गुरुवारी व शुक्रवारी जेलर, सहाय्यक अधीक्षक तसेच जेलगार्ड मिळून एकूण सहा जणांना निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकरणात म्हापसा पोलीस स्थानकात गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत.  

 

अनेक वर्षे खितपत पडलेल्या या कारागृहाचे उद्घाटन ३० मे २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर आग्वाद कारागृहासह म्हापसा, मडगाव व राज्यातील इतर महत्त्वाची कारागृहे बंद करण्यात आलेली तर सर्वात शेवटी वास्कोतील सडा कारागृह बंद करुन सर्व कैद्यांना कोलवाळ येथील कारागृहात हलवण्यात आले होते. कारागृहात एकाचवेळी वेगवेगळ्या कक्षात अंदाजीत ४५० ते ५०० कैदी ठेवण्याची सोय येथे करण्यात आली आहे तर महिलांसाठी वेगवेगळ्या कारागृहाची सोय देखील करण्यात आली आहे.  कारागृहाच्या उद्घाटनानंतर तेथील सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक गुन्ह्यात सामील असलेला नामवंत गुंड मायकल फर्नांडिस याने कारागृहातून सप्टेंबर २०१५ साली पळून जाण्याचा केलेल्या अयशस्वी प्रयत्नानंतर कारागृह तेथील घटनांसाठी चर्चेत येणास सुरुवात झाली होती. त्याचा हा प्रयत्न तेथील सुरक्षा यंत्रणेने फोल ठरवून त्याला कारागृहातच अटक केली होती. आॅक्टोबर २०१५ साली अमली पदार्थाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली अंदाजे २० विदेशी गुन्हेगारांना कारागृहातील सुरक्षा रक्षकांकडून मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. त्यात अनेक कैदी जखमी होऊन नंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेची नंतर चर्चाही झाली होती. 

कारागृहात घडलेला सर्वात मोठा प्रकार म्हणजे सुप्रसिद्ध गुंड अश्फाक बेंगे्र याचा कारागृहातील त्याच्या सहकाºयाने तिक्ष्ण हत्याराच्या साहाय्याने केलेला खून. कारागृहातील इतर कैद्यांसोबत बेंगे्र याला न्यायालयात नेण्याच्या तयारीत असताना जुलै २०१६ मध्ये सकाळी कारागृहातील दुसरा गुंड विनायक कारभोटकर यांनी त्याची हत्या केली होती. याच कारभोटकरची नंतर सडा येथील कारागृहात हत्या करण्यात आलेली. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तर कोलवाळ येथील कारागृहात कैदी व जेलगार्डने भांग प्राशन करुन दंगामस्ती केली. सुमारे ३० हून जास्त कैदी व सुरक्षा रक्षकांनी भांग प्राशन केले. त्यातील तिघेजण नंतर अत्यव्यस्थ झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करणे कारागृहाच्या प्रशासनाला भाग पडले होते. 

घडलेल्या या प्रकारात भर म्हणून ड्रग्स प्रकरणातील एक कैदी तुरुंगात परतला नाही. या प्रकरणी जेलर व साहाय्यक अधीक्षकावर निलंबनाची पाळी आलेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कैद्यांना चरस व तंबाखुजन्य पदार्था पुरवल्या प्रकरणी तीन जेलगार्डना निलंबीत केले होते. तसेच ड्युटीवर येताना बुटात लपवून अमली पदार्थ आणलेल्या आणखीन एका जेलगार्डवर कारवाई करण्यात आलेली. अशा प्रकारे गेल्या तीन दिवसात तीन प्रकरणात सहा कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आलेले. घडत असलेल्या या प्रकाराबरोबर कैद्यांजवळ कारागृहात मोबाइल फोन सापडण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी अंदाजीत २० सीसीटिव्ही कॅमेरे आणि ४ फिरते कॅमेऱ्याची सोय इथे करण्यात आली आहे. कारागृहाच्या सभोवतालच्या संरक्षक भिंतीवर २० मीटर उंचीचे ४ टॉवर तयार केले आहे. तसेच एक मध्यवर्ती चक्राप्रमाणे चालणारा टॉवर तेथे तयार करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणावरुन कारागृहावर निगराणी ठेवली जाते. कारागृहात एवढी चोख सुरक्षा व्यवस्था असताना वारंवार घडत असलेल्या बेकायदेशीर प्रकारावर मात्र सुरक्षेसंबंधीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातून सुरक्षेत असलेल्या त्रुटी स्पष्टपणे जाणवत आहेत. 

Web Title: Criminal Jail Security Issues Again Anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.