नागपुरातील काछीपुऱ्यात गुन्हेगाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:32 PM2020-01-25T23:32:59+5:302020-01-25T23:34:29+5:30
एका हत्याकांडात आरोपी असलेल्या गुन्हेगाराची घातक शस्त्राने गळा कापून सशस्त्र गुंडांनी निर्र्घृण हत्या केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काछीपुऱ्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही थरारक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका हत्याकांडात आरोपी असलेल्या गुन्हेगाराची घातक शस्त्राने गळा कापून सशस्त्र गुंडांनी निर्र्घृण हत्या केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काछीपुऱ्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही थरारक घटना घडली. हरीश रघुनाथ पटेल (वय २५) असे मृताचे नाव आहे. त्याची हत्या कुणी केली, ते स्पष्ट झाले नाही.
हरीश गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याने आठ वर्षांपूर्वी योगेश पट्टा नामक तरुणाची हत्या केली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने काछीपुºयात चायनीजचा ठेला लावला होता. मध्ये मध्ये तो दारूच्या नशेत गुन्हेगारी करायचा. विनाकारण शिवीगाळ करून दमदाटी करायचा, असे समजते. काही दिवसांपूर्वी त्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी नेहमीप्रमाणे तो चायनीजच्या ठेल्यावर गेला. वडील आणि अन्य मंडळी रात्री ११ च्या सुमारास घरी परतले. काही वेळेनंतर तो घरी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तो घरी परतलाच नाही. त्याचे वडील रघुनाथ पटेल नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे फिरायला निघाले. घरापासून काही अंतरावर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात हरीशचा मृतदेह आढळला. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. एकाने नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर बजाजनगर पोलीस तेथे पोहचले. आरोपींनी हरीशचा गळा कापल्यानंतर त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचले होते. रघुनाथ पटेल यांची तक्रार नोंदवून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
योगेशच्या हत्येचा सूड?
हरीशने योगेश पट्टा नामक तरुणाची हत्या केली होती. तेव्हापासून योगेशचे साथीदार घात लावून बसले होते. हरीशचा गेम करून योगेशच्या हत्येचा सूड घेण्याची भाषाही ते वापरत होते. हे हत्याकांड त्याचेच पर्यवसान असल्याचे बोलले जाते. दरम्यान, बजाजनगर पोलिसांनी हरीशच्या हत्येच्या आरोपात दोन संशयितांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती. अद्याप आरोपींची नावे उघड झाली नसल्याचे बजाजनगर पोलीस सांगत होते.