बदला घेण्यासाठी झाला गुन्हेगाराचा खून, सहा आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 08:39 PM2020-01-08T20:39:50+5:302020-01-08T20:42:03+5:30
तीन वर्षापूर्वी झालेल्या कुख्यात आरोपी पक्याच्या खुनानंतर बदला घेण्यासाठी शेख समीर ऊर्फ बाबूचा खून करण्यात आला. यशोधरानगर पोलिसांनी समीरच्या खुनात सहभागी सहा आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षापूर्वी झालेल्या कुख्यात आरोपी पक्याच्या खुनानंतर बदला घेण्यासाठी शेख समीर ऊर्फ बाबूचा खून करण्यात आला. यशोधरानगर पोलिसांनी समीरच्या खुनात सहभागी सहा आरोपींना अटक केली आहे.
खुनाच्या घटनेत आर्यन गुप्ता, विजय पडोळे, राहुल बोकडे, महेश ऊर्फ सोनु सोनकुसरे, प्रदीप ऊर्फ बंटी कनपटे आणि एका आरोपीचा समावेश आहे. मंगळवारी रात्री यशोधरानगर ठाण्यांतर्गत कांजी हाऊस चौकात २३ वर्षाच्या समीरचा खून करण्यात आला होता. समीरने दोन अल्पवयीन सहकाऱ्यांच्या मदतीने २०१७ मध्ये पाचपावलीचा गुन्हेगार पक्याचा खून केला होता. खुनानंतर एका वर्षात त्याची निर्दोष सुटका झाली होती. ‘लोकमत’ने पक्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याचा खुलासा केला होता. सुटका झाल्याच्या दोन वर्षानंतर खून झाल्यामुळे पोलिसांना बदला घेण्यासाठी खून झाला असे वाटत नव्हते. परंतु पकडलेल्या आरोपींची चौकशी केल्यामुळे या बाबीची पुष्टी झाली. सूत्रांनुसार समीरच्या खुनाचा सूत्रधार अंकुश सूर्यवंशी आहे. तीन वर्षापूर्वी समीरने पक्याचा खून केला होता. घटनेच्या वेळी पक्यासोबत सात-आठ साथीदार होते. तरीही समीरने पक्यावर हल्ला करून त्याच्या साथीदारांना पळण्यास भाग पाडले. त्याने फरशीने डोके फोडून पक्याचा खून केला होता. समीरच्या खुनाचा सूत्रधार अंकुश सूर्यवंशी आणि त्याचे साथीदार पक्याचे जवळचे मित्र होते. पक्याच्या खुनामुळे ते दु:खी झाले होते. पक्याचा खून झाल्यामुळे समीरचा परिसरात दबदबा निर्माण झाला होता. अंकुश आणि त्याच्या साथीदारांनी पक्याच्या खुनानंतर समीरला धडा दाखविण्याचे ठरविले होते. परंतु तुरुंगातून बाहेर आल्यानंतर समीर शांत झाल्यामुळे आरोपी आपल्या कामात लागले. काही दिवसांपासून समीर आणि अंकुशमध्ये वाद सुरु झाला. सूत्रांनुसार ६ जानेवारीला सायंकाळी समीरचा विजय जगदाळेशी वाद झाला. समीरने त्याला धमकी दिली. त्यानंतर समीरचा अंकुश सूर्यवंशीसोबत वाद झाला. अंकुशला समीरने चाकूचा धाक दाखवून धमकी दिली. त्यानंतर अंकुश सूर्यवंशीने साथीदारांना समीरच्या खुनासाठी तयार केले. मंगळवारी सायंकाळी दारू पिल्यानंतर आरोपी समीरचा शोध घेत होते. कांजी हाऊस चौकाजवळ समीर त्यांना भेटला. त्यांनी चौकाजवळ बाईक उभी करून समीरकडे धाव घेतली. समीर जीव वाचविण्यासाठी पळत होता. तो रामचंद्र कुंभारेच्या आर. के. भोजनालयात घुसला.
समीरने मागील दाराने भोजनालयात प्रवेश केला. समीरचा समोरच्या दाराने फरार होण्याचा विचार होता. त्याचा पाठलाग करून हल्लेखोर तेथे पोहोचले. भोजनालयाचे समोरचे गेट बंद असल्यामुळे समीरला पळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे तो आरोपींच्या हाती लागला. आरोपींनी जागीच त्याचा खून केला. जीव वाचल्यास समीर बदला घेईल असे आरोपींना वाटल्यामुळे त्यांनी त्याचा खून केला. अंकुश सूर्यवंशी आणि इतर आरोपी हाती लागल्यानंतर खुनाचे कारण कळू शकते. समीरच्या खुनानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यांच्या मते अवैध धंदे वाढल्यामुळे गुन्हेगार सक्रिय झाले असून पोलीस कमकुवत ठरत आहेत.
धाक निर्माण करण्यासाठी कसरत
पक्याच्या खुनानंतर बदला घेण्यासोबतच आपला धाक निर्माण करण्यासाठी समीरचा खून केल्याची माहिती आहे. महेश सोनकुसरेने तीन वर्षापूर्वी पाचपावलीत एका गुन्हेगाराचा खून केला होता. त्याचे इतर साथीदारही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. गुन्हा दाखल न झाल्यामुळे ते कारवाईपासून बचावले आहेत. पक्याच्या खुनानंतर समीरचा कांजी हाऊस चौक परिसरात दबदबा निर्माण झाल्याचे आरोपींना माहीत होते. ते समीरचा खून करून आपला धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते.