सोशल मीडियावर गुन्हेगारांचे जाळे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून होते फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:21 AM2020-10-27T00:21:39+5:302020-10-27T00:21:59+5:30

ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. डिस्काउंट ऑफरच्या बहाण्याने नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करण्यास भाग पाडून फसणूक होत आहेत.

Criminal networks on social media, fraud through buying and selling transactions | सोशल मीडियावर गुन्हेगारांचे जाळे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून होते फसवणूक

सोशल मीडियावर गुन्हेगारांचे जाळे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून होते फसवणूक

Next

- सूर्यकांत वाघमारे 
 
नवी मुंबई : ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. डिस्काउंट ऑफरच्या बहाण्याने नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करण्यास भाग पाडून फसणूक होत आहेत. अशाच प्रकरणातून उलवे येथील महिलेने घराच्या हप्त्यासाठी जमवलेल्या साडेतीन लाखांवर अज्ञाताने डल्ला मारला आहे.

लवे येथील कुटुंबाने नव्या घराच्या हप्त्यासाठी बँकेत साठवलेले साडेतील लाख रुपये गमवावे लागले आहेत. त्यांच्या १५ वर्षीय मुलाने सोशल मीडियावरून १० हजार रुपयांचा मोबाइल खरेदीसाठी अज्ञात व्यक्तीला ऑनलाइन पेमेंट केले, परंतु पैसे पोहोचले नसल्याचे सांगून, त्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या आईच्या बँक खात्यातले साडेतीन लाख रुपये हडपले, तर घराचा हप्ता भरण्यासाठी ही महिला बँकेत गेली असता, खात्यात केवळ ६०० रुपये शिल्लक असल्याचे समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

अशाच प्रकारे वाशीतील महिलेला एका तरुणीने फोन करून, तुमच्या पतीची पॉलिसी संपली असून, तिचा हप्ता आजच ऑनलाइन भरल्यास दहा हजारांची सूट मिळेल, असे आमिष दाखविले.
यानुसार, त्या महिलेने फोनवरील तरुणीने दिलेल्या अकाउंटवर ८८ हजार रुपये पाठविले होते. मात्र, अनेक दिवस होऊनही पैसे भरल्याची पावती न मिळाल्याने, त्यांनी पॉलिसी कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचे उघड झाले.

स्मार्टफोनमध्ये ऑनलाइन पेमेंटचे उपलब्ध असलेले पर्याय गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत आहेत. सध्या फेसबुक, इंस्टाग्राम, ओएलएक्स व इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वस्तू व साहित्यांची खरेदी-विक्री चालत आहे, परंतु सोशल मीडियावर विक्री करणारी व्यक्ती कोण? हे माहीत नसतानाही त्याला पैसे पाठविले जातात. परिणामी, काहींना आयुष्याची जमापुंजी गमवावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घेण्याच्या सूचना सातत्याने पोलिसांकडून होत आहेत. त्यानंतरही अज्ञान असलेल्या व्यक्ती गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत.

Web Title: Criminal networks on social media, fraud through buying and selling transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.