बॅँकांना कोट्यवधीचा गंडा घालणारा फरारी गुन्हेगार जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 03:37 PM2019-09-09T15:37:42+5:302019-09-09T15:38:42+5:30
विविध बँकेमध्ये व फायनान्स कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बनावट कागदपत्रे सादर करुन कर्ज प्रकरणे करुन सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे़.
पुणे : विविध बँकेमध्ये व फायनान्स कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बनावट कागदपत्रे सादर करुन कर्ज प्रकरणे करुन सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे़. बिपिन मुरलीधर पाटील (वय ३८, रा़ अमित ब्ल्युमफिल्ड सोसायटी, नऱ्हे, आंबेगाव) असे त्याचे नाव आहे़. गेल्या ७ वर्षांपासून तो फरारी होता़.
गुन्हे शाखेकडून पुणे शहरातील फरार आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची स्थापना केली आहे़. या पथकातील पोलीस नाईक महेश निंबाळकर यांना बिपिन पाटील हा घरी येणार असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार महेश निंबाळकर व सहायक फौजदार संभाजी नाईक यांनी त्याला घरातून ताब्यात घेतले़.
बिपिन पाटील याने साथीदारांच्या मदतीने युनियन बँकेच्या काळेवाडी शाखेत गृहकर्जाची मागणी केली होती़. बनावट कागदपत्रे सादर करुन बिल्डरच्या नावाने प्रेरणा बँकेत बनावट खाते उघडले व त्यात कर्जापोटी मंजूर केलेला २३ लाख ५० हजार रुपये जमा करुन ते काढून घेऊन फसवणूक केली होती़. याप्रकरणातील संदीप वामनराव क्षीरसागर याला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती़. इतर तिघे फरार झाले होते़. बिपिन पाटील हा सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता़.
पोलिसांनी पकडल्यावर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत़. वास्तू फायनान्स यांना ६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ३ गुन्हे डेक्कन पोलिसांकडे दाखल आहेत़. विजया बँकेस ३३ लाख रुपयांची फसवणूक तसेच फस्ट ब्ल्यु होम फायनान्स यांना ३३ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश निंबाळकर व सहायक फौजदार संभाजी नाईक, हवालदार महेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली़.
़़़़़