नवी मुंबईत गुन्हेगारांचे मी पुन्हा येईन...; पोलिसांची दमछाक
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 1, 2022 08:56 AM2022-08-01T08:56:31+5:302022-08-01T08:57:00+5:30
जामिनावरील गुन्हेगारांमुळे डोकेदुखी
- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जामिनावर सुटणारे गुन्हेगार पुन्हा गुन्ह्यात सक्रिय होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. अनेक महिने मागोवा घेऊन पकडलेले सराईत गुन्हेगार महिनाभरात जामिनावर बाहेर आल्यावर पुन्हा सक्रिय होत आहेत. त्यानंतर पुन्हा त्यांच्या शोधात पोलिसांना धावावे लागत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त नेमका कसा करायचा, असा प्रश्न पोलिसांनाही सतावत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहनचोरी असे गुन्हे रोजचेच झाले आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये सक्रिय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही, खबरी यांचा वापर करून अनेक महिन्यानंतर काही गुन्हेगार हाती लागतात. त्यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर महिनाभरात ते जामिनावर बाहेर येतात. यानंतर ते पुन्हा गुन्हेगारी कृत्ये करून पोलिसांना नव्याने त्यांचा शोध घ्यावा लागतो. कोरोनामुळे मागील काही महिन्यात मोठ्या संख्येने गुन्हेगारांना जामिनावर सोडले होते. त्यामुळेदेखील नवी मुंबईसह लगतच्या शहरात गुन्हेगारांच्या हालचाली वाढल्याने गुन्ह्यांत वाढ झाली होती.
कारवाईची भीती मेली
n दशकापूर्वी सराईत गुन्हेगार पकडला गेल्यास, पोलीस त्याला खाक्या दाखवायचे.
n यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण व्हायची, शिवाय काहीजण पुन्हा गुन्हेगारी कृत्य टाळायचे.
n मात्र, सध्या गुन्हेगारांच्या मदतीला धावणारी फळी सक्रिय असल्याने पोलिसांवरदेखील मर्यादा येत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये कारवाईची भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे.
गुन्हेगारांच्या प्रवृत्तीत सुधारणा नाही
अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीतील कालावधी अथवा सुनावणीत शिक्षा लागल्यानंतर कारागृहात त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. परंतु, बहुतांश गुन्हेगार शिक्षा भोगल्यानंतरही प्रवृत्तीमध्ये सुधारणा करण्यास तयार नसतात. त्यामुळे कारागृहातून बाहेर येताच ते पुन्हा गुन्ह्याला सुरुवात करतात.
अशा अनेक गुन्हेगारांना यापूर्वी पकडलेदेखील आहे. त्यामुळे अनेक महिने पाळत ठेवून पकडलेले गुन्हेगार, महिनाभरात जामिनावर बाहेर येत आल्याची चिंता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
काही वर्षांपूर्वी गुन्हे शाखेने ५० हून अधिक सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या गुन्हेगाराला अटक केली होती. त्याला अनेकदा अटक झाली असता, प्रत्येक वेळी काही दिवसात तो जामिनावर बाहेर येऊन पुन्हा गुन्हे करायचा.