महिलेने पोटात लपवले कोट्यवधींचे ड्रग्ज; मुंबईत एनसीबीने ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 08:33 PM2022-06-03T20:33:57+5:302022-06-03T20:34:56+5:30
Drugs Case :एनसीबीन तिच्या जवळून ५३५ ग्रॅम वजनाच्या हेरॉईन ड्रग्जच्या ४९ कॅप्सूल, कोकेन ड्रग्जच्या १७५ ग्रॅम वजनाच्या १५ कॅप्सूल असा ड्रग्जसाठा जप्त केला आहे.
मुंबई : युगांडातील महिलेने पोटात लपवलेले ३ कोटींचे हेरॉईन आणि कोकेनसारखे घातक ड्रग्ज जप्त करण्यास अंमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) (NCB) यश आले आहे. युगांडा ते मुंबई असा प्रवास करत असताना छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली.
एनसीबीन तिच्या जवळून ५३५ ग्रॅम वजनाच्या हेरॉईन ड्रग्जच्या ४९ कॅप्सूल, कोकेन ड्रग्जच्या १७५ ग्रॅम वजनाच्या १५ कॅप्सूल असा ड्रग्जसाठा जप्त केला आहे. हे ड्रग्ज मुंबईत तस्करीसाठी येणार होते? मात्र त्यापूर्वीच तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतराष्ट्रीय विमानतळावर २८ मे रोजी युगांडावरून मुंबईत आलेल्या महिलेला अडवले. एनसीबीच्या पथकाने तिच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. ती शरीर लपवत असल्याचे लक्षात येताच एनसीबीने तिच्याकडे सखोल चौकशी केली असता शरीरात सुमारे ११ प्रतिबंधित कॅप्सूल घेऊन जात असल्याचे तिने कबूल केले. वेगवेगळ्या चिकट पट्टीचा वापर करून १० कॅप्सूल लपविण्यात आल्या होत्या. एनसीबीने कॅप्सूलमध्ये लपविलेले ११० ग्रॅम हिरोईन जप्त केले.
पुढे तिला सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्या पोटातून ड्रग्जने भरलेल्या ५४ कॅप्सूल बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. यातील ३९ कॅप्सूलमध्ये हेरॉईन आणि १५ कॅप्सूलमध्ये कोकेन होते. एकूण ६४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमती ३ कोटी रुपये आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच तिला अटक करण्यात आली. याप्रकरणी तिच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे.