कोटीचे गोमांस तळेगावात जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:28 AM2018-12-24T01:28:02+5:302018-12-24T01:28:14+5:30
अवैध गोमांस वाहतूक प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन विविध ठिकाणी कारवाई करून कंटेनर आणि टेम्पोसह दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
तळेगाव दाभाडे : अवैध गोमांस वाहतूक प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन विविध ठिकाणी कारवाई करून कंटेनर आणि टेम्पोसह दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे २९ टन वजनाचे ६५ लाख रुपये किमतीच्या गोमांसाचा समावेश आहे, महंमद अक्रम खान (वय २४, रा. दुमदुमा, ता. चालकोसा, जि. हजारीबाग, झारखंड), समीर हुसेन शेख (वय ३०, झारखंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महंमद खान याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहेत. समीर शेख यास सोमवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश हनुमंत गराडे (वय ३२, रा धामणे, ता. मावळ) आणि शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी फिर्याद दिल. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश गराडे व त्यांचा मित्र शेखर गराडे शनिवारी (दि. २२) पहाटे सहाच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्याजवळ आले असताना गोमांसाची वाहतूक करणारा कंटेनर (एमएच ४३-६४५८) आढळून आला. अधिक चौकशी केली असता चालक महंमद अक्रम खान याने सदर मांस मुळेगाव तांडा, हैदराबाद रोड, सोलापूर येथून भरला असल्याचे व न्हावाशेवा (मुंबई) येथे घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने कंटेनर पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई केली. याच स्वरूपाची दुसरी कारवाई रविवारी उर्से टोलनाका येथे करण्यात आली. यात मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो (एमएच १७ बीवाय ६२२) चालक समीर हुसेन शेख (वय ३२, रा. जुन्नर,जि.पुणे)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोरक्षण समितीचे आणि बजरंग दलाचे संदेश भेगडे, प्रतीक भेगडे, प्रणव दाभाडे, शिवांकुर खेर, योगेश ढोरे, शिवशंकर स्वामी, गौरव पाटील, सचिन जवळगे, गौरव विटे, अभिजित चव्हाण, श्रीकांत कोळी, अक्षय कुडलकर, भास्कर गोलिया यांनी कारवाईत सहभाग घेतला.