कर्नाळा बँक घोटाळा: विवेक पाटील यांच्या संस्थेत कोट्यवधींची रक्कम जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:48 AM2021-06-18T07:48:07+5:302021-06-18T07:48:26+5:30
बाेगस खात्यांचा वापर. ईडीने मंगळवारी रात्री पाटील यांना पनवेल येथील राहत्या घरातून अटक केली. त्यांना २५ जूनपर्यंत ईडी कोठडी मिळाली.
लोकमत न्यूज नेट
मुंबई : कर्नाळा बँकेच्या कोट्यवधीच्या गैरव्यवहारात शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आ. विवेक पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले. बनावट खात्यावर कर्ज मंजुरी देऊन ती रक्कम त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या खात्यात वर्ग केली होती. त्यांच्यासह अनेका नेत्यांनी हा फंडा वापरून शेकडो कोटी उकळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ईडीने मंगळवारी रात्री पाटील यांना पनवेल येथील राहत्या घरातून अटक केली. त्यांना २५ जूनपर्यंत ईडी कोठडी मिळाली. ईडी तपासातून अनेक बाबी समोर आल्या. पाटील यांनी बोगस खाते बनवून कोट्यवधीचे कर्ज दिल्याचे दाखवले. नंतर पैसे स्वत:च्या संस्थांच्या खात्यांत वळवले, कर्नाळा बँकेत सुमारे ५२९ कोटींचा घोटाळा झाला. २०१८ मध्ये बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले होते. रिझर्व्ह बँकेने चौकशीसाठी अधिकारी नेमला. कर्नाळा बँक व्यवहाराबाबत चौकशीत धक्कादायक माहिती मिळाली
बँकेत सुमारे ६० हजार खातेधारक आणि ठेवीदार आहेत. त्यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने ६३ व्यक्तींना संशयास्पदरीत्या कर्ज दिले हाेते. कर्ज घेणाऱ्याकडून तारण घेतलेले नव्हते. कर्ज मंजूर केलेल्या कागदपत्रांवर संचालक मंडळाच्या सह्यादेखील नव्हत्या. स्टॅम्प ड्यूटीही भरण्यात आलेली नव्हती. अशा अनेक त्रुटी होत्या.
...येथे वळवले पैसे
६३ खात्यांवर दिलेले कर्ज हे दोन खात्यांवर वळवले होते. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या खात्यावर पैसे वळवले होते. या अकॅडमी आणि ट्रस्टचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष असलेले पाटील हेच आहेत.