‘पीएमओ’, ईडीच्या नावाने कोट्यवधींचा गंडा; भामट्याला अटक, १४ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 03:47 PM2023-08-03T15:47:12+5:302023-08-03T15:47:37+5:30
त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
मुंबई : अत्यंत वरिष्ठ राजकीय नेते व नोकरशहांशी आपले संबंध असून आपण कोणत्याही प्रकरणातून तुम्हाला वाचवू शकतो, असे सांगत दिल्ली, मुंबई, पुणे यासह देशातील तब्बल ४२ शहरांतील विविध क्षेत्रांतील व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या संजय प्रकाश राय या दिल्लीस्थित भामट्याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. त्याची १४ कोटी ५४ लाखांची मालमत्ता जप्त करत त्याला अटक केली आहे. याच प्रकरणी अलीकडेच दिल्ली, पुणे येथे ईडीने छापेमारी केली होती. त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
यापैकी दिल्लीस्थित एका मोठ्या व्यावसायिकाच्या एका प्रकरणात ईडी चौकशी करत होती. त्याची माहिती संजय प्रकाश राय याला मिळाल्यानंतर त्याने याप्रकरणी त्याला अटक होऊ शकते, अशी भीती दाखवत त्याच्याकडून १२ कोटी रुपये उकळले होते. यापैकी ६ कोटी त्याने स्वतःच्या नावे स्थापन केलेल्या एका ट्रस्टमध्ये घेतले, तर उर्वरित सहा कोटी रुपये त्याने रोखीने घेतले. रोखीने घेतलेले हे ६ कोटी रुपये त्याने दागिने खरेदीचे बनावट व्यवहार दाखवत स्वतःच्याच केवळ कागदोपत्री असलेल्या कंपन्यांमध्ये फिरवत तिथून स्वतःच्या दोन मुलांच्या बँक खात्यात जमा केले. या खेरीज देशातील अन्य शहरांतील उद्योजकांनाही अशाच प्रकारे ब्लॅकमेल करत त्याने अडीच कोटी रुपयांची माया गोळा केली. याप्रकरणी पोलिस तक्रारीत जेव्हा त्याचे आर्थिक व्यवहार दिसून आले, तेव्हा त्याचे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर ईडीने देशात अनेक ठिकाणी छापेमारी करत त्याच्या १८ बँक खात्यांत असलेले १४ कोटी ५२ लाख रुपये, एक स्थावर मालमत्ता व एक मर्सिडिज गाडी जप्त केली आहे.
व्यावसायिकांना गंडा
- आपली पतंप्रधान कार्यालय, ईडी, डीआरआय, कस्टम विभागात उच्चाधिकाऱ्यांपर्यंत ओळख असल्याचे सांगत काही उद्योजकांना गंडा घालणाऱ्या आणखी एका भामट्याला ईडीने अटक केली आहे.
- मोहम्मद कासिफ असे त्याचे नाव असून त्याला गाझियाबाद येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून अधिकाऱ्यांनी १ कोटी १० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.