वर्क फ्रॉम होम देण्याच्या नावाखाली देशातील तरुणांना करोडोंचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 05:00 PM2021-11-29T17:00:18+5:302021-11-29T17:00:56+5:30

Cyber Crime : सुरुवातीला देशभरातून पोलिसांना सुमारे ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली सर्वांची फसवणूक झाल्याचा आरोप सर्व तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

Crores of rupees of the youth of the country in the name of giving work from home dupped | वर्क फ्रॉम होम देण्याच्या नावाखाली देशातील तरुणांना करोडोंचा गंडा

वर्क फ्रॉम होम देण्याच्या नावाखाली देशातील तरुणांना करोडोंचा गंडा

Next

नोकरी देण्यापूर्वी आरोपींनी या तरुणांकडून काही बनावट करार करून त्यावर सह्या घेतल्या. पुढे नोकरीच्या नावाखाली तरुणांना कामासाठी असे टार्गेट दिले गेले जे कधीच पूर्ण होऊ शकले नाहीत. काम न पूर्ण केल्याने झालेला करार दाखवून तरुणांकडून खंडणी उकळण्यात आली. न्यायालयाचा धाक दाखवून पैसे न भरणाऱ्यांकडून वसुली करण्यात आली. आतापर्यंत पाचशेहून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या लोकांनी हजारो लोकांची फसवणूक केल्याची भीती व्यक्त होत आहे.


सायबर सेलचे पोलीस उपायुक्त केपीएस गिल यांनी सांगितले की, नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) वर  फसवणूक झालेल्या अनेक तरुणांनी आपली तक्रार नोंदवली आहे. सुरुवातीला देशभरातून पोलिसांना सुमारे ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली सर्वांची फसवणूक झाल्याचा आरोप सर्व तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपींनी बनावट वेबसाइट तयार केल्याचे पोलिसांना समजले. या वेबसाइट्सच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या काम करून खूप कमाई करू शकता, असा दावा वेबसाइटवर करण्यात आला होता. तरुण त्यांच्या जाळ्यात येताच आरोपी त्यांना धमकावून पैसे उकळायचे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक सज्जन सिंग, एसआय धर्मेंद्र कुमार आणि इतरांची टीम तयार करण्यात आली.

चार आरोपींना दिल्लीतील मोहन गार्डन आणि मायापुरी भागातून अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात या लोकांनी देशभरातील ५०० हून अधिक तरुणांना करोडोंचा गंडा घातल्याचं निष्पन्न झाले आहे. या लोकांनी देशभरातील हजारो तरुणांची फसवणूक केल्याचे मानले जात आहे. पोलीस त्यांच्या बँक खात्यांचा तपास करत आहेत.

तपासादरम्यान रोहित कुमार हा टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बनावट वेबसाइट तयार करून त्याने फसवणूक सुरू केली. त्यांनी बँक खात्यांची व्यवस्था केली. याशिवाय तो स्वत: टीम लीडर म्हणून बनावट कॉल सेंटर चालवत होता. अटक करण्यात आलेले उर्वरित तीन आरोपी हे टेलिकॉलर आहेत. या प्रकरणात आणखी काही लोक सामील असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

 

कोविड पसरत असताना लॉकडाऊन दरम्यान, देशभरातील अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत वर्क फ्रॉम होम करू लागले. याचा फायदा घेत आरोपींनी बनावट वेबसाइट तयार केली. जॉब प्लेसमेंट साइट्सवरून डेटा विकत घेऊन आरोपी त्या तरुणांशी संपर्क साधायचा. याशिवाय अनेकवेळा तरुण स्वतःहून त्यांच्या वेबसाइटवर येत असत.

सुरुवातीला पीडितांकडे त्यांचे आधार, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रांची मागणी करण्यात आली. यानंतर ऑनलाइन बनावट फसवा करारनामा करण्यात आला. टार्गेटनुसार सर्व कामे करावी लागतात, असे आरोपी सांगत. टार्गेट पूर्ण न झाल्यास किरकोळ दंड भरावा लागेल. पुढे कामाच्या नावाखाली त्रस्त तरुणांना असे टार्गेट दिले गेले जे कधीच पूर्ण झाले नाही. यानंतर कोर्टाचा धाक दाखवून कराराच्या नावाखाली तरुणांकडून त्यांच्या खात्यात पाच ते दहा हजार, १५ ते २० हजार रुपये टाकायला सांगून पैसे उकळले.

बनावट वकील आणि पोलीस कर्मचारी वापरण्यात आले...


जर कोणत्या तरुणाने आरोपींना दंड भरण्यास नकार दिला, तर आरोपी त्यांना बनावट वकील बनून फोन करायचे. त्यांना न्यायालयाच्या नोटिसांचा धाक दाखवण्यात येई. याशिवाय आरोपी पोलीस असल्याची बतावणी करून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धमकावायचे. अशा परिस्थितीत बहुतांश तरुण घाबरून आरोपींच्या खात्यात पैसे टाकायचे. अटक आरोपींची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.बनावट पत्त्यांवर ज्यांनी आरोपींची बँक खाती आणि सिमकार्ड बनवले, त्यांचाही शोध घेतला जात आहे.
 

Web Title: Crores of rupees of the youth of the country in the name of giving work from home dupped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.