सुटीवरून कालच कामावर रुजू झाला; सीआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:52 PM2022-09-20T23:52:55+5:302022-09-20T23:53:59+5:30
अमरीशकुमार हे सीआरपीएफमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. सुट्टी घेऊन ते गावी गेले होते. तेथून परतल्यानंतर ते काल कामावर रुजू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये मंगळवारी (दि. २०) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
अमरीशकुमार गिरी (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरीशकुमार हे सीआरपीएफमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. सुट्टी घेऊन ते गावी गेले होते. तेथून परतल्यानंतर ते काल कामावर रुजू झाले. रात्रपाळीसाठी ते सीआरपीएफ कॅम्प येथील कार्यालयात आले. मात्र, त्यानंतर कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.