क्रूर आत्याची सूडकथा : भाच्यासोबत चुलत भावाच्याही हत्येची सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:31 AM2019-11-24T00:31:35+5:302019-11-24T00:33:28+5:30
क्रूर आत्याने ऑटोचालक भाच्यासोबतच स्वत:च्या चुलत भावाच्या हत्येचीही सुपारी दिली होती. भाच्याची हत्या करवून घेतल्यानंतर ती आणि तिच्या मुलीचा प्रियकर (सुपारी किलर मारेकरी) दुसऱ्याचा गेम वाजविण्याच्या तयारीत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रूर आत्याने ऑटोचालक भाच्यासोबतच स्वत:च्या चुलत भावाच्या हत्येचीही सुपारी दिली होती. भाच्याची हत्या करवून घेतल्यानंतर ती आणि तिच्या मुलीचा प्रियकर (सुपारी किलर मारेकरी) दुसऱ्याचा गेम वाजविण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे या प्रकरणातील दुसऱ्या व्यक्तीचा जीव बचावल्याची धक्कादायक माहिती आरोपींच्या जबानीतून पुढे आली आहे.
प्रकरण पारडीतील ऑटोचालक अरुण वाघमारेच्या हत्याकांडात वाठोडा पोलिसांनी त्याची आत्या रत्नमाला मनोज गणवीर, तिची मुलगी शुभांगी ऊर्फ पिहू, शुभांगीचा प्रियकर किसन ऊर्फ अमन नरेश विश्वकर्मा आणि रत्नमालाचा भाऊ पंकज राजेंद्र खोब्रागडे या चौघांना अटक केली.
नात्यातील एखादी महिला सूड उगविण्यासाठी कशी क्रूर बनते, त्याचे हे उदाहरण ठरावे. पोलिसांसाठी पंटरगिरी (एजंट) करणारी रत्नमाला पारडी, कळमन्यात राहते. अरुण तिच्या चुलतभावाचा मुलगा होता. रत्नमालाचा भाऊ अविनाश खोब्रागडे याने चार महिन्यांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. खोब्रागडेच्या आत्महत्येसाठी अरुण आणि त्याचे दोन साथीदारच जबाबदार आहेत, असा त्यावेळी रत्नमाला आणि खोब्रागडेच्या नातेवाईकांना संशय होता. त्यानंतर त्याच्या मुलीचे लग्न जुळले आणि तुटले. हे लग्न अरुणच्या आईने तोडल्याचा संशय रत्नमालाला होता. अरुणची आई जादूटोणा करते, तिनेच आपल्या प्रणिता नामक मुलीवर जादू केली. त्यामुळे तिची प्रकृती खराब होऊन ती मरणासन्न अवस्थेपर्यंत गेली होती, असाही गैरसमज रत्नमालाला होता. त्याचमुळे ती अरुणवर आणि अरुणची नेहमी बाजू घेणारा त्याचा काका शेषराव वाघमारेवर रत्नमाला कमालीची चिडून होती. त्या दोघांचा कधी काटा काढते, असे तिला झाले होते. त्यामुळे मुलगी शुभांगीच्या माध्यमातून तिचा मित्र किसनला आरोपींनी आपल्या जाळ्यात ओढले होते. त्याला एक लाखाची सुपारी देऊन (५० हजारात अरुणचा तर ५० हजारात त्याचा काका (आरोपी रत्नमालाचा चुलतभाऊ शेषराव संतोष वाघमारे याची) दोघांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे १६ नोव्हेंबरला किसनने अरुणला पारडीत गाठले आणि त्याला भूलथापा मारून घटनास्थळी नेले.
तेथे त्याच्यावर घातक शस्त्राचे घाव घालून त्याला ठार मारले आणि त्याचा ऑटो भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ नेऊन सोडला. तेथून तोंडाला दुपट्टा बांधून आरोपी पळून गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी किसन विश्वकर्माचा छडा लावला. त्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये रत्नमाला गणवीर आणि रत्नमालाची मुलगी शुभांगी आणि आरोपी पंकज खोब्रागडेंचे अनेक कॉल, मेसेज आढळले. तो धागा धरून पोलिसांनी त्यांना अटक केली.
विलंब झाला असता तर...!
अटकेनंतर आरोपी किसन विश्वकर्माने रत्नमाला, शुभांगी आणि पंकजने अरुणसोबतच त्याचे काका शेषराव वाघमारे याची हत्या करण्याचाही कट रचल्याचे आणि शेषरावचीही हत्या करण्याची संधी शोधत होतो, अशी ख्नळबळजनक कबुली दिली. अर्थात आरोपींना पकडण्यात पोलिसांकडून विलंब झाला असता तर अरुण वाघमारेनंतर शेषराव वाघमारेचाही गेम होणार होता.
परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही.पी. मालचे, एपीआय एन. टी. गोसावी, हवालदार राधेश्याम खापेकर, शिपाई आशिष बांते, हिमांशु पाटील, मंगेश टेंभरे, मिलिंद ठाकरे, चेतन पाटील, मिथून नाईक, दीपक तरेकर, पूनम सेवतकर यांनी या प्रकरणाच्या तपासात मोलाची भूमिका वठविली.