फाशी यार्डला क्रूरकर्मा वसंता दुपारेची प्रतिक्षा, फाशी लांबली!
By नरेश डोंगरे | Published: July 29, 2023 10:00 PM2023-07-29T22:00:12+5:302023-07-29T22:01:50+5:30
राष्ट्रपतींनी याचिका फेटाळल्यानंतर आरोपीची सर्वोच्च न्यायालयात धाव
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा वसंता दुपारे याच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणी संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रपतींकडून त्याचा दयेचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने तूर्त त्याची फाशी लांबली आहे. त्यामुळे नागपूर कारागृह प्रशासन आणि कारागृहातील फाशी यार्ड क्रूरकर्मा दुपारेच्या फाशीची तारीख कोणती ठरणार, त्याची प्रतिक्षा करत आहे.
क्रूरकर्मा दुपारे याने २००८ मध्ये एका चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणात त्याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात तो सर्वोच्च न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका मे २०१७ ला फेटाळून त्याला फाशी देण्याचा निर्णय बरोबर ठरवला होता. त्यानंतर त्याने दयेची याचिका सादर केली होती. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी २८ एप्रिल २०२३ ला त्याची याचिका फेटाळून लावत त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. परिणामी दुपारेला फासावर टांगले जाणार, हे स्पष्ट झाले होते. मात्र, त्याला कोणत्या तारखेला फाशी द्यावी, या संबंधाने निर्णय व्हायचा होता.
परिणामी नागपूर आणि राज्य कारागृह प्रशासन आदेशाची वाट बघत होते. दरम्यान, दिल्लीतील वकिलांचे एक पथक मे महिन्यात नागपूर कारागृहात आले. त्यांनी दुपारेची भेट घेतली. यानंतर राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका सादर करण्याचे सुतोवाच दुपारेंच्या वकिलांनी कारागृह अधिकाऱ्यांशी बोलताना केले होते. दरम्यान, २१ जुलैला कारागृह प्रशासनाला दुपारेच्या फाशी विरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे दुपारेची फाशी तूर्त लांबली आहे. आता नागपूर कारागृहातील फाशी यार्ड आणि कारागृह प्रशासन सर्वोच्च न्यायालयाचा निकालाची वाट बघत आहे.
याकूबच्या फाशीला आठ वर्षे पूर्ण
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा साथीदार याकूब मेमन याला ३० जुलै २०१५ ला नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली होती. तत्पूर्वी देशातील सर्वोच्च न्यायालयाचे दार मध्यरात्री उघडून न्यायालयात पहाटेपर्यंत या शिक्षेविरोधात युक्तीवाद झाला होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले होते. या ऐतिहासिक घटनेला आता ८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
प्राथमिक तयारी झाली होती.
एप्रिल महिन्यात दुपारेच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडून फेटाळल्या गेल्यानंतर ३० जुलैच्या आत त्याला शिक्षा दिली जाईल, असा कारागृह प्रशासनाचा अंदाज होता. त्यामुळे शिक्षेच्या अंमलबजावणीची प्राथमिक तयारी स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरू केली होती. मात्र, दुपारेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने या क्रूरकर्म्याची फाशी आणखी काही दिवस लांबली आहे. संबंधित वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया सुरू करून फाशीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. -वैभव आगे, अधीक्षक, नागपूर कारागृह