Aryan Khan Bail : आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी; 'या' नव्या वकीलासह उतरणार शाहरुखची टीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 10:38 AM2021-10-13T10:38:15+5:302021-10-13T10:42:38+5:30
न्यायाधीश व्हीव्ही पाटील यांनी एनसीबीला उत्तर दाखल करण्यासाठी बुधवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.
मुंबई - शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामिनावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. त्याच्या जामिनासाठी, त्याचे वकील गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु प्रत्येक वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) काही ना काही पेचात निर्माण करत आहे. 11 ऑक्टोबरला सत्र न्यायालयात आर्यनला जामीन मिळू शकला नाही. आता त्याच्या जामिनासंदर्भात नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Aryan Khan bail hearing)
आर्यनची केस आता 'हे' ज्येष्ठ वकील लढवणार -
आर्यन खानची केस आतापर्यंत सतीश मानशिंदे लढवत होते. मात्र, आता शाहरुख खानने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांना ही केस लढविण्यासाठी हायर केले आहे. अमित देसाई हे 11 ऑक्टोबरलाही सतीश मानशिंदे यांच्यासह न्यायालयात दिसले होते.
एनसीबीने मागितला होता तीन दिवसांचा वेळ -
11 ऑक्टोबरला विशेष न्यायालयात आर्यनच्या जामिनासंदर्भात एनसीबीने बुधवारपर्यंतचा वेळ मागितला होता. आर्यनचे वकील अमित देसाई आणि सतीश मानशिंदे, हे दोघेही सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास न्यायालयात पोहोचले होते. यावेळी एनसीबीच्या वतीने खटला लढवणारे विशेष सरकारी वकील एएम चिमळकर (AM Chimalker) म्हणाले होते, की तपास सुरू असल्याने पुरावे गोळा करण्यासाठी त्यांना विलंब होत आहे. युक्तिवादानंतर न्यायाधीश व्हीव्ही पाटील यांनी एनसीबीला उत्तर दाखल करण्यासाठी बुधवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. आता या संदर्भातील सुनावणी दुपारी 2:45 वाजता होईल.
शाहरुखच्या ड्रायव्हरचीही करण्यात आली आहे चौकशी -
यासंदर्भात, एनसीबीने शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स पाठवले होते. यानंतर त्याचीही ड्रग्स प्रकरणात सुमारे 12 तास चौकशी करण्यात आली. एनसीबीने आर्यन खान आणि त्याच्या मित्रांसंदर्भात ड्रायव्हरची चौकशी केली. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने कबूल केले आहे, की त्याने आर्यन आणि अरबाज यांना क्रूझ टर्मिनलवर सोडले. एनसीबीने ड्रायव्हरचा जबाबही नोंदवला आहे.