बाळाला स्तनपान देताना कारने चिरडले; बोरिवलीतील घटनेत आईचा मृत्यू, बाळ गंभीर जखमी; चालकाचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 08:14 AM2022-02-07T08:14:08+5:302022-02-07T08:15:52+5:30
मनीषा म्हात्रे - मुंबई : पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर फुगे विकून आल्यानंतर रात्री बाळाला दूध पाजत असतानाच एका मातेवर ...
मनीषा म्हात्रे -
मुंबई: पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर फुगे विकून आल्यानंतर रात्री बाळाला दूध पाजत असतानाच एका मातेवर काळाने घाला घातला. बोरीवलीतील आर. एम. भट्ट रोडवर ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. भरधाव कारचालकाने या मातेला अक्षरश: चिरडले, तर तिच्या कुशीत विसावलेले बाळ अपघातात थोडक्यात बचावले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर माय-लेकाला रक्ताच्या थारोळ्यात सोडून फरार झालेल्या निर्दयी कारचालकाचा बोरिवली पोलीस शोध घेत आहेत.
मुळचे राजस्थानातील रहिवासी असलेले बावरिया कुटुंब ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात गेल्या दोन महिन्यापासून भाडेतत्त्वावर राहते. धनराज बावरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरीच्या शोधात दोन मुलांना गावी ठेवून पत्नी लाडबाई (२९) आणि पाच महिन्यांच्या देवांशसह मुंबई गाठली. नोकरी न मिळाल्याने मुंबईच्या सिग्नलवर फुगे व स्ट्रीट लाइट विकून उदरर्निवाह सुरू केला. नेहमीप्रमाणे, १ फेब्रुवारीला सकाळी पत्नीसोबत कोरा केंद्र सिग्नल येथे फुगे विकण्यासाठी आलो. पत्नी मुलासह सिग्नलच्या दुसऱ्या बाजूला फुगे विकत होती, तर मी दुसऱ्या ठिकाणी होतो. रात्री आठच्या सुमारास पत्नीला कारने धडक दिल्याचे समजताच मी तिच्या दिशेने धाव घेतली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पत्नी आणि जखमी अवस्थेत देवांश दिसला. मी क्षणाचाही विलंब न करता दोघांनाही रिक्षातून शताब्दी रुग्णालयात गाठले.
राजस्थानमध्ये महिलेवर अंत्यसंस्कार
धनराज बावरिया यांनी सांगितले की, उपचारादरम्यान डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केले, तर देवांशच्या पायाचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाळाला स्तनपान करीत असताना कारचालकाने तिला धडक देत पळ काढला. मात्र, बाळाला घट्ट कवटाळून ठेवल्यामुळे ते थोडक्यात बचावले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात मिळाला. त्यानंतर बावरिया कुटुंबीय राजस्थानला रवाना झाले आहेत. तेथे पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत, कारचालकाचा शोध सुरू केला आहे.
निनाद सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बोरीवली पोलीस ठाणे पत्नीमुळे तीन मुलांचा सांभाळ करणे शक्य होते. आता तीही सोबतीला नाही. अपघातात लहान मुलाचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. इथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. अशात मुलाच्या उपचाराचा खर्च कसा भागवायचा असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी लवकर त्या चालकावर कठोर कारवाई करावी.
- धनराज बावरिया, तक्रारदार