बाचाबाचीतून दगडाने ठेचले; मुखेड तालुक्यातील वाहन चालकाच्या खुनाचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:44 PM2021-07-06T21:44:01+5:302021-07-06T21:44:33+5:30
Murder Case : याप्रकरणी हेळंब येथील दाेघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
लातूर : नांदेड जिल्ह्यातील बिहारीपूर (ता. मुखेड) येथील एका वाहनचालकाचा वलांडी (ता. देवणी) शिवारात दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना १६ जून राेजी घडली हाेती. याबाबत देवणी पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, या खून प्रकरणाचा तीन आठवड्यानंतर उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी हेळंब येथील दाेघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
पाेलिसांनी सांगितले, बालाजी शेषेराव बनसाेडे (३५) हे पीकअप वाहन चालवून आपला उदरनिर्वाह चालवित होते. ते सध्याला उदगीर शहरात वास्तव्याला हाेते. १६ जून राेजी दुपारी निलंगा येथे भाडे घेवून गेले हाेते. सायंकाळच्या सुमारास उदगीरकडे येत असताना वालांडी शिवारात त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला हाेता. वलांडीपर्यंत आहे, तासाभरात घरी येताे, असे कुटुंबीयांना बालाजी बनसाेडे यांनी आपल्या माेबाईलवरुन सांगितले हाेते. मात्र, त्यानंतर त्यांचा आणि कुटुंबीयांचा संकर्प तुटला. रात्रभर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांना घातपाताचा संशय आल्याने त्यांनी शाेधाशाेध केली असता, वलांडी शिवारात सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी देवणी पाेलीस ठाण्यात प्रारंभी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. अज्ञातांनी त्यांचा खून करुन वाहनही पळविले हाेते. याबाबत पाेलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तीन आठवड्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे हेळंब येथील विकास रघुनाथ सूर्यवंशी (२९) आणि ज्ञानेश्वर भारत बाेरसुरे (२१) या दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. पाेलिसी खाक्या दाखवताच दाेघांनीही खुन केल्याची कबुली दिली.
हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजनान भातलवंडे, पाेलीस निरीक्षक कामठेवाड, सपाेनि. सूधीर सूर्यवंशी, पाेउपनि. संजय भाेसले, सपाेउपनि. खान, राजेंद्र टेकाळे, रामहरी भाेसले, राहुल साेनकांबळे, सदानंद याेगी, याेगेश गायकवाड, सिचन धारेकर, चालक जाधव यांच्या पथकाने केला.
समाेर येउन वाहन अडविले...
आरेापी विकास आणि ज्ञानेश्वर हे देवणी तालुक्यातील हेळंब पाटी येथे सायंकाळच्या सुमारास थांबले हाेते. उदगीरकडे जायचे आहे, म्हणून त्यांनी रस्त्यावर आडवे येत चालक बालाजी बनसाेडे यांचे वाहन अडविले. याच कारणावरुन त्यांच्यात आणि चालक बालाजी बनसाेडे यांच्यात वाद झाला. यातूनच आम्ही डाेक्यात दगड घालून चालकाला गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग उचलून वलांडी शिवारातील शेताच्या बांधालगत टाकून दिले. त्यानंतर माेबाईल, ओळखपत्र, पाॅकिट व वाहन घेवून फारार झालाे, अशी कबुली आराेपींनी दिली आहे. दरम्यान, या खूनाच्या घटनेला अखेर वाचा फुटल्याने दाेघांच्या मुस्क्या आवळल्यात पाेलिसांना यश आले.