विकृतीचा कळस! मालाडमध्ये कापली मांजरीची शेपटी; पोलिसांकड़ून आरोपीचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 03:28 PM2021-05-03T15:28:55+5:302021-05-03T15:32:07+5:30
Animal Abuse : एक महिन्यापूर्वीच दिला दोन पिल्लांंना जन्म
मनीषा म्हात्रे
मुंबई : मालाडमध्ये नुकतेच दोन पिल्लांंना जन्म दिलेल्या मांजरीची एका विकृताने धारदार हत्याराने शेपटी कापल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये समोर आली आहे. मालाड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. अजय रमेश शहा (३६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. शहा हे मालाडच्या एस. व्ही. रोड येथील भाद्रण नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहण्यास आहेत. त्यांच्या घरी एक दोन वर्षाची मांजर ये जा करत असते. ते तिला खाण्यासाठी देतात.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ एप्रिल रोजी ती मांजर सकाळी ८ च्या सुमारास घरी आली. तिला नेहमी प्रमाणे खाण्यासाठी दिले. ती व्यवस्थित होती. तीच्यासोबत खेळलो तिचे व्हिडीओही काढले. अशात २ में रोजी दुपारी दीडच्या सुमारास घरी आली तेव्हा मांजरीची शेपटी कापलेली दिसून आली. जवळच्या प्राण्याच्या डॉक्टरकड़े नेले. तेथे कुठल्या तरी धारदार वस्तूने शेपटी कापल्याचे समोर आले. सोमवारी तिला पुन्हा डॉक्टरांकड़े घेऊन येण्यास सांगितले.
प्राण्यासाठी काम करणारे पोलीस अधिकारी सुधीर कुडाळकर यांच्यापर्यंत हे प्रकरण येताच शहा यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. तसेच पोलिसांशी बोलून याबाबत सहकार्य करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शहा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. शहा यांनी मांजरीची शेपटी कापणाऱ्याविरुद्ध कड़क कारवाई करण्यास सांगितले आहे.
महिन्याभरापूर्वीच दिला दोन पिल्लांंना जन्म
कुडाळकर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीत यात जखमी झालेल्या मांजरीने महिन्याभरापूर्वीच दोन पिल्लाना जन्म दिला होता. आरोपीच्या शोधासाठी आमची टीमही पाठपुरावा करत आहे.
धक्कादायक : मालाडमध्ये विकृताने कापली मांजरीची शेपटी pic.twitter.com/QtF0EYQbE3
— Lokmat (@MiLOKMAT) May 3, 2021