गुन्हेगारीचे नवे माध्यम; आता इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 09:26 AM2020-02-23T09:26:36+5:302020-02-23T09:28:20+5:30

माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरून खंडणी मागितल्याचा हा पहिलाच गुन्हा वसईत दाखल झाला आहे.

culprit make ransom demand to private video viral from Instagram | गुन्हेगारीचे नवे माध्यम; आता इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी

गुन्हेगारीचे नवे माध्यम; आता इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी

Next

वसई : एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी जीमेल, मोबाईल, फेसबूकसारख्या माध्यमांचा याआधी वापर केला जात होता. आता गुन्हेगारांनी थोडे पुढचे पाऊल टाकले आहे. फोटोंसाठी प्रसिद्ध असलेले इन्टाग्रामवरच खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. 


माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरून खंडणी मागितल्याचा हा पहिलाच गुन्हा वसईत दाखल झाला आहे. वसईच्या माणिकूपर पोलीस ठाण्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुण, तरुणीचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका अनोळखी अकाऊंटवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये या जोडप्याची एक आक्षेपार्ह चित्रफित टाकून ही चित्रफित इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली होती. जर हे थांबवायचे असेल तर ९० हजार रुपये खंडणी बिटकॉईनच्या माध्यमातून देण्याची मागणी त्याने केली.

फिर्यादी तरुणाने ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र, अनोळखी इसमाकडून व्हिडीओंचा गैरवापर होण्याची भीती होती. त्यामुळे शेवटी त्याने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३८४ अन्वये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


 माणिकपूर पोलिसांनी याप्रकऱणी इन्स्टाग्रामला संपर्क केला असून संबंधित खात्याची तांत्रिक माहिती मागवली आहे. हे खाते बनावट आहे. मात्र, तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे इन्स्टाग्रामवरून ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले.


खाजगी छायाचित्रे काढताना काळजी घ्या
या प्रकरणात फिर्यादी जोडप्यांनी काढलेले खाजगी छायाचित्रे आणि चित्रफित ही लिक झाली आणि अज्ञात व्यक्तीच्या हाती सापडली. त्या आधारे तो ब्लॅकमेल करत आहे. अशी खाजगी छायाचित्रे आणि चित्रफिती काढणे धोकादायक असल्याने ती काढू नये असे पोलिसांनी सांगितले. मोबाईल हरवला, तो दुरूस्तीला दिला तर मोबाईल मध्ये असलेल्या खाजगी छायाचित्रांचा गैरवापर केला जातो. तसेच मोबाईल हॅक करूनही अशी छायाचित्रे पळवली जातात, असे पोलिसांनी सांगितले.

आम्ही या प्रकरणी इन्स्टाग्राम कंपनीशी संपर्क करून तपासकामात मदत मागितली आहे. खंडणी मागणाऱ्याचे खाते बनावट आहे. मात्र, इन्स्टाग्रामने काही तांत्रिक माहिती दिलेली आहे. त्याद्वारे आम्ही आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत.
- राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस ठाणे

Web Title: culprit make ransom demand to private video viral from Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.