चक्क घरासमोरील अंगणात गांजाची लागवड; अकोट येथील आरोपीस अटक
By नितिन गव्हाळे | Published: September 17, 2022 05:14 PM2022-09-17T17:14:20+5:302022-09-17T17:15:51+5:30
अकोट शहरातील भिम नगरात एकाने घरासमोरील अंगणात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली.
अकोला - आतापर्यंत बार्शीटाकळी तालुक्यात गांजाची लागवड करण्यावर कारवाई करण्यात येत होती. परंतु आता अकोट शहरात एका आरोपीने चक्क घरासमोरील अंगणात गांजाची लागवड केल्याचे शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईने उघड झाले आहे. पोलिसांनी अंगणातील १० किलो वजनाचे व १२ फूट उंचीचे गांजाचे झाड जप्त केले असून, आरोपीस अटक केली आहे.
अकोट शहरातील भिम नगरात एकाने घरासमोरील अंगणात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकासह भिम नगरातील गणेश पांडूरंग दारोकार(४५) यांच्या घरात छापा घातला. त्यावेळी गांजाचे झाड आढळून आले. आरोपी गणेश दारोकार या गांजाच्या झाडाची पाने वाळवून, त्याची विक्री करीत होता. पोलिसांनी गांजाचे झाड जप्त केले असून, या झाडाची बाजारपेठेतील किंमत ५० हजार रूपये आहे. आरोपीविरूद्ध अकोट शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलम २० ब नुसार गुन्हा दाखल केला आहे.