विमानाच्या टॉयलेटजवळ सापडलं तब्बल २ कोटी किमतीचं सोनं, कस्टम अधिकारी पाहातच बसले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 03:01 PM2023-03-05T15:01:21+5:302023-03-05T15:01:52+5:30
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं केलेल्या तपासात जवळपास १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली-
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं केलेल्या तपासात जवळपास १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. कस्टम अदिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली असता एका करड्या रंगाच्या बॅगमध्ये हे कोट्यवधींचं सोनं आढळून आलं आहे. कस्टम विभागाचे अधिकारी आता याची चौकशी करत आहेत.
टॉयलेट सिंकच्या खाली चिकटवलं होतं पॅकेट
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान आंतरराष्ट्रीय मार्गावरील आहे. आज सकाळी दिल्ली विमानतळावर ते लँड झालं. यादरम्यान विमानाचे टॉयलेट साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिंकजवळ काही पॅकेट चिकटलेली दिसली. याबाबत कर्मचाऱ्यांनी कस्टम विभागाला माहिती दिली.
दोन कोटी रुपयांचे सोने जप्त
कस्टम टीमने घटनास्थळी पोहोचून टेपला अडकवलेले हे पॅकेट बाहेर काढले. या पाकिटात एकूण ३९६९ ग्रॅम वजनाची सोन्याची चार बिस्किटे आढळून आली. त्याची किंमत १ कोटी ९५ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. सीमाशुल्क कायदा १९६२ च्या कलम ११० अन्वये सोन्याचे हे पाकीट जप्त करण्यात आले आहे.