इतिहासकालीन तलवारीने केक कापणं पडलं महागात; थेट घडली जेल वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 09:03 PM2021-02-10T21:03:19+5:302021-02-10T21:03:54+5:30
Crime News : पुढील कारवाईसाठी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका मुलाने ही तलवार दिल्याचे समीर ढमाले याचे म्हणणे आहे.
पुणे : भर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्यांना जमवून वाढदिवस साजरा करण्याची सध्या फॅशन आली आहे. रविवार पेठेत मध्यरात्रीच्या सुमारास इतिहासकालीन तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अटक केली आहे.
समीर अनंत ढमाले (वय २७, रा. गणेश पेठ, लोणकर वाडा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून २६ इंच लांबीचे दुधारी पाते व ६ इंच लांब नक्षीदार मुठ असलेली इतिहासकालीन तलवार जप्त करण्यात आली आहे. समीर ढमाले याने मित्रांसह २३ जानेवारी रोजी मध्यरात्री रविवार पेठेत वाढदिवस साजरा करुन भर रस्त्यात तलवारीने केक कापला होता. पोलीस अंमलदार अजय थोरात यांना समीर तलवार घेऊन रविवार पेठेत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका मुलाने ही तलवार दिल्याचे समीर ढमाले याचे म्हणणे आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, महेश बामगुडे यांनी ही कामगिरी केली.